• अनैतिक संबंधातून विवाहित महिलेची निघृण हत्या, नागोठणे पोलिसांनी केले तीन तासात आरोपीस जेरबंद
• महिला आरोपीची आत्या, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांची माहिती
• सुरक्षा रक्षक जयेश घासे, चेतन गदमले व पो. ना. गंगाराम डुमणे यांची कौतुकास्पद कामगिरी
रायगड वेध अनिल पवार रोहा
नागोठणे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रिलायन्स वसाहतीच्या प्रवेशद्वारा समोरील करकरणी मातेच्या मंदिराच्या दिशेने वर डोंगराळ व जंगल भागात एका व्यक्तीने एका महिलेची निघृणपणे हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला असल्याची दुर्दैव घटना रविवार दि. ३ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत शिहू मुंढाणी येथील रहिवासी असलेले युवक सुरक्षा रक्षक जयेश यशवंत घासे, चेतन गदमले व पो.ना. गंगाराम डुमणे यांनी दाखविलेल्या कार्यकुशलतेमुळे संशयित आरोपीस नागोठणे पोलिसांकडून अवघ्या तीन तासात जेरबंद करण्यात आले असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा पोलिस अधिक्षक अतुल झेंडे यांनी दिली असून नागोठणे पोलिस ठाण्यात गु. र. नंबर ००४१/२०२२भा. द. वि. कलम ३०२,२०१ प्रमाणे आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात नागोठणे पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार तसेच अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार मयत महिलेस (वय ३२ वर्षे) हिला आरोपी (वय २२ वर्षे) याने रविवार दि. ३ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास यामाहा कंपनीची मोटारसायकलवरून (क्र. एमएच ०४/ एफ एन ४४९६) नागोठणे जवळील रिलायन्स कंपनीच्या वसाहतीच्या प्रवेशद्वारा समोरील करकराणी मातेच्या मंदिराच्या दिशेने वर डोंगराळ व जंगल भागात आडमार्गाला नेवून तिला जिवे ठार मारून तिच्यावर पेट्रोल ओतून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने जाळले होते. याचदरम्यान साधारणतः 3 वाजता आरोपी त्या महिलेस मोटारसायकल वरून करकरणी देवी मंदिराकडील डोंगराळ भागात घेऊन जात असताना याच परिसरात सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असलेल्या जयेश यशवंत घासे या युवकाने पाहिले होते. त्यानंतर काही वेळाने आरोपी आपल्या मोटारसायकल मधून पेट्रोल घेऊन जाताना दिसला. यावेळी आरोपीच्या हालचाली जयेश घासे व चेतन गदमले यांना संशयास्पद वाटल्याने तसेच सायं ६ वाजण्याच्या सुमारास जंगलातून धूर येत असल्याचे दिसल्याने या दोघांनीही त्या ठिकाणी धाव घेतली असता आरोपी पळून जात असताना दिसला, त्याचवेळी जयेश याने आरोपीच्या मोटारसायकलचा फोटो आपल्या मोबाईल मध्ये काढला तर दुसरीकडे पाहिले तर मृत महिलेचा मृतदेह जळत असल्याचे दिसले. यावेळी जयेशने कोणतीही वेळ न दवडता नागोठणे पोलिसांना या घटनेची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच नागोठणे पोलिसांनी जयेश कडून संपूर्ण माहिती मिळताच पोलिस उपविभागीय अधिकारी प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पो. नि. तानाजी नारनवर यांनी जलद गतीने तपास यंत्रणा सुरु करत पो.ना. गंगाराम डुमणे यांच्या मदतीने मोटारसायकलच्या क्रमांकावरून शोध घेत आरोपीस तीन तासात जेरबंद केले.
दरम्यान ज्या महिलेची निघृणपणे हत्या करण्यात आली ती महिला आरोपीची चुलत आत्या होती. ही महिला घटस्फोटित होती आणि तीचे दुसरे लग्न देखील झाले होते. ही महिला पेण येथे एका दवाखान्यात परिचारिका म्हणून काम करत होती. आरोपी व या महिलेचे अनैतिक संबंध होते. त्यातून ही महिला आरोपी कडून सतत पैस्यांची मागणी करत होती तसेच या महिलेने आरोपीवर दवाखान्यात वापरात येणाऱ्या ब्लेडने वार देखील केला होता. त्या रागातुन आरोपीने त्या महिलेची हत्या केली असावी अशी प्राथमिक माहिती यावेळी अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली.
जयेश घासे व चेतन गदमले यांचा होणार सन्मान- अतुल झेंडे
नागोठणे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिहू- मुंढाणी येथील रहिवासी असलेले रिलायन्स वसाहती समोर सुरू असलेल्या एल अँड टी कंपनीच्या कामा ठिकाणी सुरक्षारक्षक म्हणून काम करत असताना दाखवलेल्या कार्यकुशलतेमुळे निघृणपणे हत्या करून पलून गेलेल्या आरोपीच्या मुसक्या पो.ना. गंगाराम डुमणे यांच्या मदतीने अवघ्या तीन तासात नागोठणे पोलिसांनी आवळल्या.या कौतुकास्पद कामगिरी बद्दल जयेश घासे, चेतन गदमले या युवकांसह पो.ना.गंगाराम डुमणे यांचा जिल्हा पोलिस मुख्यालयाकडून यथोचित सन्मान करणार असल्याचे यावेळी अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी यावेळी सांगितले.