Type Here to Get Search Results !

श्रीवर्धन मध्ये पर्यटकांची वाट दिशाहीन• म्हसळा बायपास मार्गावरून उलट-सुलट प्रवास• रस्त्यावर फलक व नकाशा नसल्याने पर्यटक हैराण• सार्वजनिक बांधकाम आणि महाराष्ट्र रस्ते विकास मंडळ यांचे एकमेकांकडे बोट


• श्रीवर्धन मध्ये पर्यटकांची वाट दिशाहीन

• म्हसळा बायपास मार्गावरून उलट-सुलट प्रवास

• रस्त्यावर फलक व नकाशा नसल्याने पर्यटक हैराण

• सार्वजनिक बांधकाम आणि महाराष्ट्र रस्ते विकास मंडळ यांचे एकमेकांकडे बोट


रायगड वेध गणेश प्रभाळे बोर्ली पंचतन

 पर्यटनाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या श्रीवर्धनकडे येताना दिशादर्शक फलकांची मागणी जोर धरू लागली आहे. कारण मुंबई, पुणेहून दिवेआगर पर्यटन स्थळाला भेट देताना म्हसळा बायपास मार्गावरुन चुकीचा प्रवास होत असल्याने वाहनचालकांची चांगलीच गैरसोय होत आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर पर्यटनाला जाताना दिघी - पुणे या महामार्गावरून 15 किलोमीटर अंतराचा प्रवास होत आहे. सद्या म्हसळा बायपास मार्गावरून श्रीवर्धन, दिवेआगर जाणाऱ्या अनेक वाहनांना सोडण्यात येते. मात्र, या मार्गावर दिशादर्शक फलक नसल्याने दिवेआगर जाणारा प्रवाशी श्रीवर्धन मार्गे 34 किलोमीटरचा उलट प्रवास करत पोहचत आहे. त्यामुळे दिवसा - रात्री वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तरी देखील संबंधित विभाग याकडे कानाडोळा करत असल्याचे प्रवाशांकडून बोलले जात आहे.

माणगाव, महाड, मुरुड, म्हसळा व श्रीवर्धन तालुक्‍यातील इतर महत्वाची पर्यटनस्थळे जोडणाऱ्या रस्त्यांवर दिशादर्शक फलकच नाही शिवाय असलेल्या दिशादर्शक फलकांची सध्या महामार्गाच्या कामात दयनीय अवस्था झालेली आहे. काही ठिकाणी फलक जमीनदोस्त झालेले आहेत. तर अनेक ठिकाणी या फलकांवर जाहिरातींचे फलक झळकत आहेत. त्यामुळे तालुक्‍यात येणाऱ्या पर्यटकांची दिशाभूल होऊन पर्यटक व भाविक भरकटत असल्याचे पहावयास मिळत आहे.

मुरुड वरून दिघी मार्गे, लोणेरे वरून गोरेगाव मार्गे, माणगाव वरून साई मार्गे, दापोली वरून हरिहरेश्वर तसेच आंबेत मार्गे पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत असतात. योग्य दिशा दर्शक फलक नसल्याने स्थानिकांना विचारत श्रीवर्धन कडे येत असतात. मात्र, याकडे आता लक्ष देणार कोण? असे एक ना अनेक प्रश्न विचारले जात आहे. रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले गवत व रान वनस्पती रस्त्यावर येत आहेत. रस्त्याकडेची झाडे झुडुपे तोडली नसल्यामुळे काही फलक झाडांच्या फांद्याआड लपलेले आहेत. हे फलक न दिसल्याने वाहन चालकांची व पर्यटकांची दिशाभूल देखील होत आहे. पर्यटन विकासाला चालना मिळण्यासाठी फलक महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात.

महामार्गाचे काम सुरू असताना पर्यटकांना सोयीचे असणारे श्रीवर्धन व म्हसळा तालुक्‍यातील दिशादर्शक फलक दिशाहीन असून, त्यांची वेळेत डागडुजी न केल्याने ते सध्या शेवटची घटका मोजत असल्याचे दिसते आहे. दरम्यान श्रीवर्धन तालुक्‍यातील पर्यटन क्षेत्राचा विस्तार मोठा आहे. त्यामुळे वर्षाकाठी तालुक्‍यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या सुमारे लाखावर आहे. संपूर्ण देशातून तालुक्‍यामधील प्रेक्षणिय स्थळे पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असते. मात्र, येथील रस्त्यावर असलेली दिशादर्शक फलके पाहून येणाऱ्या पाहुण्यांची दमछाक होत आहे. कित्येक ठिकाणी दिशादर्शक फलक नसल्याने परजिल्ह्यातील तसेच पर्यटकांची दिशाभूल होऊन आडवळणी प्रवास करावा लागत आहे.

पर्यटनाचा नकाशा असावा -

पर्यटकांची दिशाभूल होऊ नये यासाठी अंतर्गत भागात तात्पुरत्या फलकांवर आजूबाजूला असलेल्या ठिकाणांची माहिती नकाशाच्या माध्यमातून दर्शवली जावी. किती किलोमीटरवर कुठले ठिकाण, तिथे कसे जाता येईल असा संपूर्ण तपशील उपलब्ध व्हावा अशी मागणी पर्यटक करत आहेत.

मी पुणे येथून दिवेआगर पर्यटन स्थळी भेट देण्यास आलो. मात्र, ज्या मार्गावर उपरस्ते मिळतात अशा मूळ ठिकाणी दिशादर्शक फलक नसल्याने दिवेआगर पोहचण्यासाठी मला जवळ- जवळ अर्धा तास चुकीचं प्रवास करण्यात वेळ गेला. आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला.
- राजेंद्र बोधे, मुंबई.

म्हसळा बायपास मार्गावरून प्रवास करताना मार्ग दाखवणारा फलक नाही. त्यामुळे दिवेआगर येथे वेळेत पोहचता आले नाही. एक - दीड तासांचा प्रवास वाढल्याने अनेक नियोजनावर पाणी फिरले.
- युवराज घोणे, भोर - पुणे. 

गुगल मॕप तरी काय करणार - 

मार्ग चुकल्याने अनेकजण गुगल मॕप चा वापर करतात. मात्र, त्यातही त्यांना भरकडत चुकीच्या मार्गाने प्रवास करावा लागत आहे. कारण मार्ग चुकल्याने गुगल मॕप तरी काय करणार.

येथे होते चुकामुख -

म्हसळा बायपास च्या सुरुवातीला व बायपास मार्ग संपताच दिवेआगर कडे जाण्यासाठी दिशादर्शक फलक लावण्यात यावे. त्यामुळे प्रत्येक प्रवाशांचा पुढे जाऊन चुकीचा प्रवास थांबेल. 

कोण सुविधा पुरवणार -

दिघी - पुणे महामार्गाचे काम महाराष्ट्र रस्ते विकास मंडळ यांच्या अखत्यारीत होत आहे. त्यामुळे या मार्गावर मार्ग दाखविणारे फलक सार्वजनिक बांधकाम विभाग की महाराष्ट्र रस्ते विकास मंडळ बसविणार असा प्रश्न प्रवाशांना भेडसावत आहे.

 पुणे मुंबईहून श्रीवर्धन पर्यटन स्थळाला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांचा म्हसळा बायपास या ठिकाणी दिशादर्शक फलक नसल्याने चुकीचा प्रवास होत असतो.

झुडपात गुरफटलेले फलक, (छाया - गणेश प्रभाळे )

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test