• महिला हत्या प्रकरणात मोलाची मदत करणारे जयेश घासे, चेतन गदमले यांचा जिल्हा पोलिस अधिक्षकांकडून सत्कार
• सामान्य नागरिक दक्ष राहिले तर प्रशासन दखल घेतेच - पोलिस निरीक्षक तानाजी नारनवर
रायगड वेध अनिल पवार नागोठणे रोहा
नागोठणे पोलिस ठाण्याच्या हद्दीत रिलायन्स कंपनी वसाहती समोर करकरणी देवीकडे जाणार्या मार्गावर झालेल्या महिला हत्या प्रकरणातील आरोपीला अटक करण्याकामी नागोठणे पोलिसांना मोलाचे सहकार्य करणारे नागोठणे जवळील शिहू येथील रहिवासी आर. एन. कंपनीचे सुरक्षा रक्षक जयेश घासे व चेतन गदमले यांचा रायगड जिल्हा पोलिस मुख्यालय, अलिबाग येथे मासिक गुन्हे सभेच्या वेळी जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांनी भरभरून कौतुक करून प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करत यथोचित सन्मान केला. त्यावेळी अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते. दरम्यान एखाद्या वाईट प्रवृत्तीच्या गुन्ह्याच्या बाबतीत सामान्य नागरिक दक्ष राहिले तर प्रशासन त्याची निश्चितच दाखल घेते असे या प्रकरणावरून दिसुन येते असे नागोठणे पोलिस निरीक्षक तानाजी नारनवर यांनी याावेळी सांगितले.
पोलिस निरीक्षक तानाजी नारनवर यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, महिला हत्या प्रकरणातील आरोपी त्या महिलेस मोटारसायकल वरून नागोठणे हायवेनाक्याच्या बाजूने शिहू भागाकडे घेऊन जात असल्याचे सीसीटीव्हीत दिसले आहे. रिलायन्स कंपनीच्या एल अँड टी विभागाचे काम चालू आहे तेथे आर एन कंपनीचे सुरक्षा रक्षक म्हणून जयेश घासे व चेतन गदमले हे काम पाहत असताना दुपारी ३.३० वाजण्याच्या दरम्यान त्यांनी आरोपी त्या महिलेसह करकरणी मातेच्या मंदिराच्या पायऱ्या जवळ जात असलेला त्यांना दिसला. मंदिराच्या पायऱ्या जवळ त्या दोघांमध्ये वादविवाद चालू असल्याचे त्यांना दिसले तेव्हा काहीतरी गौडबंगाल आहे असे जयेश व चेतनला संशय आला म्हणून या बाबतीत ते जागरूक राहिले. काही वेळाने आरोपी शिहू येथे गेला व तेथून त्याने माचीस व शिगरेट विकत घेऊन परत मंदिराच्या पायऱ्या जवळ आला. त्या अगोदर आरोपीने त्या महिलेस मारून टाकले होते. आरोपीने मोटारसायकल मधून एका बाटलीत पेट्रोल काढले व पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने महिलेच्या बॉडीवर पेट्रोल ओतले व जाळले. करकरणी मातेच्या मंदिर भागातून धूर येत असल्याचे दक्ष असलेले जयेश व चेतन यांनी पहिले व ते त्या दिशेने गेले तेव्हा आरोपी एकटाच मोटारसायकल वरून पळून जात असल्याचे या दोघांनी पहिले त्यावेळी जयेश याने तत्परता दाखवून मोटारसायकलचा फोटो काढून घेतला त्यामुळेच आम्हाला आरोपी तात्काळ पकडण्यात यश आले. जयेश व चेतन यांनी केलेल्या कौतुकास्पद कामगिरीमुळे अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी त्याच दिवशी येऊन दोघांचे कौतुक केले. जयेश व चेतन यांच्या कामगिरीची जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांनी लगेच दखल घेऊन त्यांचा सत्कार केला असल्याची माहिती नागोठणे पोलिस निरीक्षक तानाजी नारनवर यांनी दिली.