मेंदडीकोंड आदिवासीवाडी येथे विविध शासकीय दाखल्यांचे वाटप
रायगड वेध श्रीकांत बिरवाडकर म्हसळा
कातकरी लोकांना शासकीय योजनांचा लाभ घेता यावा यासाठी “कातकरी उत्थान योजना” ही योजना आणली आहे. या योजनेमुळे कोकण विभागासह इतर विभागातील कातकरी समाजाला शासकीय योजनांचा प्रत्यक्ष तत्काळ लाभ मिळणार आहे. याच उद्देशाने लोकाभिमुख कार्यक्षम गतिमान व पारदर्शक करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराजस्व अभियान राबविणेबाबत निर्देश दिलेले आहेत. या अंतर्गत गावोगावी असणाऱ्या विविध आदिवासी वाड्यांध्ये गरीब व गरजू आदिवासी बांधवांना आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा यामध्ये जातीचे दाखले, उत्पन्न दाखले, वय अधिवास दाखले शिधापत्रिका, इत्यादी बाबींची शिबीरे घेऊन वाटप करण्याबाबत सूचना दिल्या आहेत म्हणजेच शासन आपल्या दारी या सुविधा पुरविण्याचे दृष्टिकोनातून म्हसळा तालुक्यातील मेंदडी कोंड आदिवासी वाडी येथे विविध शासकीय दाखले वाटप व सप्तसूत्री कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आदिवासी लाभार्थ्यांना जातीचे दाखले ७७, उत्पन्न दाखले ६२, वय अधिवास ८६, आधार कार्ड ३० शिधापत्रिका ०५ असे दाखले वाटप करण्यात आले.
जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांचे संकल्पनेतून म्हसळा तहसीलदार समीर घारे यांचे मार्गदर्शनाखाली कातकरी उत्थान अभियान अंतर्गत दाखले वाटप व सप्तसुत्री कार्यक्रम घेण्यात आला असून आदिवासी लाभार्थीना लोककल्याणकारी योजनांचा लाभ घेता यावा व त्यांना शासनाच्या मुख्य प्रवाहात सामील होऊन त्यांचे हक्क व अधिकार मिळावेत यासाठी मोफत दाखले वाटप करण्यात आले असल्याची माहिती मेंदडी सजा तलाठी गजानन गिरे यांनी दिली. यावेळी तहसीलदार समीर घारे, मंडळ अधिकारी रवींद्र उभारे, तलाठी गजानन गिरे, सरपंच, वाडी अध्यक्ष व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.