• दिघी-माणगांव राष्ट्रीय महामार्गावरील अपूर्ण कामांमुळे धोका.
• कोट्यवधी रुपये खर्चूनही घोणसे घाटात अपघात होतच आहेत
• या मार्गावरील काही स्पॉट वाहतुक दारांना अपघाताला खुणावतायत.
रायगड वेध संतोष शिलकर वेळास आगर
जागतिक दर्जाचे दिघी-पोर्ट आताचं अदानी पोर्टच्या अनुषंघाने भविष्यात होणाऱ्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती झाली आहे. कोट्यावधी रुपये खर्च होत आहेत.या महामार्गाचे काम मे.जे.एम.म्हात्रे या रायगड जिल्ह्यातील एका प्रसिध्द ठेदारांकडे आहे. त्यांचं काम अंतिम टप्प्यात आहे. कामांच्या दर्जा विषयी अनेक वेळा अनेक वृत्त पत्रांतून अनेक बातम्या प्रसिध्द झाल्या आहेत. मौजे-घोणसे घाटातील असंख्य जीवघेण्या अपघातांची शृंखला मोडीत निघेल असं वाटत होतं पण घोणसे घाट उतरतांना आजही शेवटून दुसरा राईट टर्न आजही धोक्याचं टर्न म्हणूनच राहिलं आहे. इथं कठडा बांधून सुध्दा अनेक अपघात झाले अनेक वाहने कठडा तोडून खाली गेली.पुढे रखडलेला म्हसळा बायपास अनेक तांत्रिक अडचणीतुन कामं करत करत मौजे-तोंडसुरे गावाच्या हद्दीतून दिघीकडे वाटचाल करत आहे. पुढे लांब लच्चक आणि ठीक ठिकाणी रस्त्याला गेलेले तडे बघत असतांना अनेक प्रश्न उभे राहतात. पुढे सावधानता बाळगावी असा वडवली(गोंडघर) फाटा,त्या फाट्यावरचे लेफ्ट आणि धोकादायक राईट टर्न घेऊन लगेच अंदाजे ३०/३५ मीटरवर अपूर्ण राहिलेला काही फुटांचा पॅच, तोहि कोणाचा ना कोणाचा प्राण किंवा हात-पाय मोडतोड करण्यास आ वासून तयारीत असल्याचा इशारा देतोय.इथं पर्यंत धोकादायक वळणांवर कुठेही साईडगार्ड दिसत नाहीत. मौजे-वेळास-कुडगांवच्या मध्यावर श्री. शंकर मंदीराच्या थोडं पुढे ते भरणा फाट्याच्या थोडं पुढं पर्यंत अशाच काही तांत्रिक अडचणींमुळे रखडलेलं अंदाजे ८०/९० मिटरचे काम,या मोठ्या अंतरात झालेली रस्त्याची दैनावस्था वाहतुकीसाठी जीवघेणी ठरली आहे. दिघी, करलास, सावर्डे, कुडगांव, हरवीत या ठिकाणाहुन आजारपणात औषध उपचार घेणाऱ्यांस, गर्भवती स्त्रियांना बोर्ली-पंचतन, श्रीवर्धन, म्हसळा या ठिकाणी जावं यावं लागतं. हा प्रवास देखील धोक्याचं झालं आहे.विशेषतः दुचाकी, रिक्षा, मिनिडोअर, कार्स यातून प्रवास करताना अतिशय धोक्याचं झालं आहे.तसेच मुरुड, अलिबाग या ठिकाणी जाण्या-येण्या करीता दिघी येथील जंगल जेठीकडे जाणाऱ्या प्रवाशांना व पर्यटकांना या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
पुढे डोंगर उतारावर पावसाळी अतिवृष्टीमुळे डोंगर माथ्यावरून दरडी येण्याच्या शक्यता नाकारता येणार नाहीत.काही ठिकाणी डोंगर माथ्यावरून येणाऱ्या दरडी रस्त्यावर उतरू नयेत म्हणून दोन ठिकाणी अपूर्ण संरक्षण भिंती उभ्या केल्या आहेत पण त्या पुरेशा नाहीत.आवश्यक आहे तिथे त्या बांधाव्याच लागतील,भरणा पासून थोडं पुढे उताराच्या उजव्या बाजूला संरक्षण कठडा नसल्याने,एखादं वाहन खोल दरीत जायला वेळ लागणार नाही.अशा अनेक समस्या या राष्ट्रीय महामार्गावर आहेत.ज्या अपघाताला खुणावतायत,त्या किमान येणारा पावसाळा चालू होण्या अगोदर पूर्ण होतील ना ? हा प्रश्न असून त्या अपूर्ण कामांची पूर्तता मान्सून पूर्व पूर्ण होतील ना ? अशी या परीसरातील नागरिकांची शंका आहेच शिवाय चावडीवर चर्चा पण चालू आहे.