गालबोट न लावता आगामी सण, जयंती व पालखी सोहळा उत्सव साजरा करा - पो.नि. तानाजी नारनवर
रायगड वेध अनिल पवार नागोठणे रोहा
नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये आगामी काळात श्रीराम नवमी, महावीर जयंती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, श्री हनुमान जयंती तसेच श्री पळसाई माता पालखी सोहळा,श्री आक्कादेवी माता पालखी सोहळा, नागोठणे गावची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माता पालखी सोहळा या निमित्ताने साजरे करण्यात येणाऱ्या उत्सव तसेच पालखी सोहळा कोणत्याही प्रकारचे वादविवाद न करता रितसर परवानगी घेऊन शासनाच्या अटी शर्तीचे पालन करत नियमांनुसार सर्व कार्यक्रम शांततेत पार पाडत पालखी सोहळा व उत्सव भक्तिमय वातावरणात सोहळ्यास गालबोट लागणार नाही याची काळजी घेत उत्साहात साजरा करण्यात यावा अशी सुचना नागोठणे पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांनी केली. नागोठणे पोलीस ठाण्यात दि. ०८ रोजी सायंकाळी ०६ वा. आयोजित आगामी येणारे सण उत्सव साजरे करण्यासंदर्भात शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी भाईसाहेब टके, विलास चौलकर, बाळासाहेब टके, हिरामण कोकाटे, मारुती शिर्के, ज्ञानेश्वर शिर्के, सुनिल लाड, ज्ञानेश्वर सांळुखे, राजेश पिंपळे, नितीन राऊत, विक्रांत घासे, गणपत डाकी, योगेश ठाकूर, मंगेश कामथे, रुपये नागोठणेकर, प्रथमेश काळे, दिनेश घाग, प्रमोद नागोठणेकर, पो.ह. विनोद पाटील यांच्यासह पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर पुढे म्हणाले की, नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागोठणेसह पळस, शेतपळस, मुरावाडी, शिहू, गांधे-चोले या ठिकाणी रामनवमी उत्सव, हनुमान जयंती याजबरोबर अनेक ठिकाणी चैत्र महिन्यात होणारा ग्रामदेवता पालखी सोहळा साजरा करताना कोणत्याही प्रकारचे भांडण तंटे होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. मागील काही वर्षांत पालखी सोहळ्यात अथवा उत्सवात कोणत्याही प्रकारचे भांडण तंटे झाली असतील तर त्याची पूर्व माहिती पोलीसांना द्यावी जेणेकरून त्या ठिकाणी पोलीस प्रशासन सतर्क राहून मार्ग काढत मोठी घटना घडणार नाही.कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेत कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यावी.राजकिय मतभेद टाळावेत. छोटे-मोठे वादविवाद असल्यास लगेच पोलीसांना सांगावे. कुठेही डिजे साऊंड सिस्टीम लावू नये. ज्या ठिकाणी वादविवाद किंवा अनुचित घटना घडली तर त्या ठिकाणी आयोजक अथवा उत्सव कमिटीच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई होतील. दरम्यान नागोठणे ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माता पालखी सोहळा कमीतकमी वेळेत पूर्ण करण्यात यावा अशी सुचना देऊन अनेक दाखले देत अनमोल असे मार्गदर्शन यावेळी पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांनी उपस्थितांना केले.