पेण येथील डॉ.शेखर धुमाळ यांना आरोग्य भूषण पुरस्कार जाहीर
रायगड वेध प्रशांत पोतदार पेण
जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा या प्रमाणे वैद्यकीय क्षेत्रात अविरत सेवा देणारे व नेहमीच समाजसेवेत अग्रेसर असणारे पेण येथील प्रसिद्ध डॉक्टर शेखर धुमाळ यांना सह्याद्री आरोग्य भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. सदर पुरस्काराचे वितरण विधानसभेचे उप सभापती नरहरी सीताराम झिरवळ यांच्या हस्ते मंगळवार 12 एप्रिल रोजी यशवंत चव्हाण सेंटर,मुंबई येथे होणार आहे.
सदर पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री भारती पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, सह्याद्री मल्टिसिटी फायनान्स चेअरमन संदीप थोरात आदींसह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पेण तालुक्यातील जोहे गावातील प्रसिद्ध डॉक्टर शेखर रामदास धुमाळ हे वैद्यकीय क्षेत्राबरोबर विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात. गोरगरीब रुग्णांसाठी मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया, मूतखडासाठी वेगवेगळ्या उपाययोजना, संधीवातावर अनेक शिबिरे यांसह शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवित असतात. या अविरत सेवेबद्दल डॉ.धुमाळ यांना विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.