टिम रायगड
एप्रिल मे महिना आणि आग ओकणारा सुर्य. प्रचंड उष्णता हे ठरलेलंच आहे. दरवर्षीप्रमाणे आता कडक उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. हवामानातील बदलांमुळे विविध प्रकारचे आजार उदभवतात. उन्हाची तीव्रता वाढल्याने प्रामुख्याने त्वचाविकार, उलट्या, उष्माघात, एसिडिटी, डोळे तापणे, थकणे, चक्कर येणे, थकवा येणे हे आजार संभवतात. उन्हाळ्यात अनेक आजार होत असल्याने प्रत्येकाने स्वत:चं आरोग्य स्वत: जपलं पाहिजे. हे आजार टाळण्यासाठी प्रत्येकाने दक्षता घेणं आवश्यक आहे.
आहार कसा घ्यावा?
उन्हाळात अधिक जेवण जात नाही. त्यामुळे आहार हलका असावा. उन्हाळ्यात अन्न लवकर खराब होते, यासाठी नोकरदार वर्गाने आपला जेवणाचा डबा खराब झाला नाही ना, याची पहिल्यांदा खात्री करुन त्यानंतर अन्नाचे सेवन करावे. त्याचबरोबर गरम, तिखट तसेच जड अन्नपदार्थ खाणे टाळावेत. कारण उन्हाळ्याच्या दिवसात वातावरणातील आणि शरीरातील तापमान अधिक वाढते. या दरम्यान फळ व फळभाज्यांचा वापर अधिक प्रमाणात करावा. द्राक्ष, अननस, गाजर व काकडी खावी यामुळे शरीराला पाणी अधिक मिळते. जेवणामध्ये गरम मसाले, लाल पावडर व मिरची मसाला जास्त प्रमाणात वापरणे शक्यतो टाळावे. तसेच तेलकट, तिखट व बाहेरील जंक फूड खाण टाळावं. जेवणात शक्यतो वरण-भात, दही, ताक सॅलड असे पदार्थ असल्यास आरोग्यास उत्तम. त्याचबरोबर जेवणाच्या आधी फळे खाणे शरीरास उत्तम असते.
पाण्याचे सेवन अधिक करावे
उन्हाळ्यात पाणी अधिक प्रमाणात पिणे गरजेचे असते. दररोज १२ ते १५ ग्लासपेक्षा जास्त पाणी प्यावे. तसेच नारळपाणी, ताज्या फळांचा रस, नीरा, ताक, लस्सी, लिंबूपाणी, कोकम सरबत, ग्लूकोज डी या गोष्टी कायम सोबत ठेवाव्यात. तसेच कृत्रिम कोल्ड्रिंक सेवन करणे टाळावे. निरोगी शरीरासाठी नियमित व्यायाम आवश्यक आहे. व्यायामाच्या दोन तास आधी सामान्यत: २४ टक्के द्रवपदार्थ घ्यावेत. व्यायाम सुरू करण्यापूर्वी ८ टक्के द्रवपदार्थाचं सेवन करावे. व्यायाम करताना थोडी जास्त काळजी घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे
हे कपडे परिधान करावेत
उन्हाळ्याच्या दिवसात शक्यतो फिकट व पांढऱ्या रंगाचे सैल कपडे घालावेत. काळ्या किंवा निळ्या गडद रंगाचे कपडे घालणे शक्यतो टाळावे. कारण गडद रंग तुलनेने जास्त उष्णता शोषून घेतो. घाम शोषून घेतला जाईल असे कपडे घालणे अधिक चांगले. बाहेर पडताना टोपी, स्कार्फ व छत्रीचा वापर करणे गरजेचे आहे. तसेच डोळ्यांच्या संरक्षणासाठी गॉगलचा वापर करावा तर उन्हात बाहेर जाताना शरीराला सनस्क्रीम आदी १५ मिनिटे लावून मग घराबाहेर पडणे योग्य ठरेल. तसेच बाहेर जाताना सहसा कॉटनचा सनकोट घालणे व शक्य असल्यास हातात ग्लोव्हज् घालणे गरजेचे आहे.
काळजी कशी घ्यावी
उन्हाळ्यात होणारे आजार व उष्माघातचा त्रास आपण टाळू शकतो, मात्र त्यासाठी थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. जेव्हा वातावरणातील तापमान खूप वाढू लागते, त्यावेळी शक्यतो उन्हात बाहेर फिरणे टाळावे. विशेषतः दुपारी ११ ते ४ वाजेपर्यंत उन्हाची तीव्रता जास्त असल्याने बाहेर पडू नये. कुठेही बाहेर जाताना कायम सोबत गोड पदार्थ किंवा चॉकलेट ठेवावे. जेणेकरून ग्लानी आली असता इलेक्ट्रोल पाणी प्यायल्याने त्वरीत आराम मिळतो.
चप्पल कोणती वापरावी
उन्हाळ्यात रबरी चप्पल किंवा प्लास्टिकची चप्पल वापरणे शक्यतो टाळावे. रबर किंवा प्लास्टिकच्या चप्पल उन्हाळ्यात लवकर गरम होतात. याउलट उन्हाळ्यात चामड्याची चप्पल वापरणे अधिक चांगले असते. चामड्याचा नैसर्गिक गुणधर्म उष्णता शोषून घेणे हा असल्याने चामड्याची चप्पल वापरली तर उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते.