नागोठणे येथे रंगाची वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात
रायगड वेध अनिल पवार नागोठणे रोहा
मुंबई गोवा महामार्गावर नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपासून अपघाताची मालिका सुरूच असताना दि. १२ रोजी मध्यरात्री १२.३० ते १ वाजण्याच्या सुमारास नागोठणे आंगर आळी समोर मुंबई गोवा महामार्गावर रंगाचे डबे वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात झाला असून यात रंगाचे डबे व ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
यासंदर्भात उपलब्ध माहितीनुसार ट्रक चालक माजिद सालिम मकरानी (वय - २६ वर्षे) रा. सुरज कराडी, जि. जामनगर, गुजरात हा त्याच्या ताब्यातील रंगाचे डबे भरलेला ट्रक घेऊन माणगाव बाजूकडून वडखळ बाजूकडे रस्त्याच्या परीस्थितीकडे दुर्लक्ष करत तसेच वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करून अतिवेगाने जात असताना मुंबई गोवा महामार्गावर नागोठणे आंगर आळी समोर आला असता चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक साईड पट्टीच्या खाली उतरून आंगर आळी कडे साकवाच्या वरच्या बाजूला पलटी झाला. या अपघातात ट्रक चालक माजिद हा बालंबाल बचावला मात्र ट्रक पलटी झाल्याने यातील रंगाचे डबे बाहेर पडून त्यातून रंग आंगर आळी कडे जाणार्या रस्त्यावर पडले होते. तसेच यात ट्रकचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या अपघाताची नोंद नागोठणे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. गणेश भोईर हे अधिक तपास करीत आहेत.