श्रीवर्धन तालुक्यात महिला दिवस उत्साहात साजरा
• महिलांसाठीच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविणार - - अमित शेडगे प्रांताधिकारी श्रीवर्धन
रायगड वेध गणेश प्रभाळे बोर्ली पंचतन
कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये अनेक कुटुंबातील कर्ता व्यक्ती कुटुंबापासून दुरावला आहे. कोरोना कालावधीमध्ये कोरोनाने बाधित होऊन मयत झालेल्या कुटुंबांना आधार देण्यासाठी शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सदैव तयार आहे. प्रशासकीय योजनांच्या माध्यमातून स्त्री सक्षमीकरण यासाठी प्रशासकीय यंत्रणा सदैव सज्ज आहे. असे प्रतिपादन श्रीवर्धन चे प्रांताधिकारी अमित शेडगे यांनी केले आहे. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत श्रीवर्धन प्रांताधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मध्ये अमित शेडगे यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला आहे.
शेडगे म्हणाले महिला सबलीकरणासाठी शासनाने विविध योजना सुरु केल्या आहेत. योजनाचा लाभ तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा तत्पर आहे. कोरोनाने मयत झालेल्या कुटुंबांना आर्थिक मदत सरकारकडून दिली जात आहे. प्रत्येक लाभार्थ्यांना मदत पोहोचविणे प्रशासकीय यंत्रणेचे दायित्व आहे. आपण कुणालाही कोणत्याही स्वरूपाची अडचण असेल तर त्यांनी तात्काळ श्रीवर्धन तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधावा. संजय गांधी योजना त्यासोबत इतर महिलांसाठी असलेल्या प्रत्येक योजनेचा पात्र महिलांनी लाभ घ्यावा असे अमित शेडगे यांनी सांगितले आहे. सदर कार्यक्रमासाठी श्रीवर्धनचे तहसीलदार सचिन गोसावी, महिला व बाल विकास विभागाच्या स्थानिक पदाधिकारी आणि तालुक्यातील विविध महिला उपस्थित होत्या.
श्रीवर्धन मधील गोखले कॉलेजमध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत स्वामी यांनी उपस्थित सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. गोखले एज्युकेशन चे प्राचार्य श्रीनिवास जोशी शहरातील महिला समितीच्या विविध पदाधिकारी सदर प्रसंगी उपस्थित होत्या . श्रीवर्धन पोलीस ठाण्यातील महिला कर्मचारी शहरातील विविध महिला नी मोटरसायकल वरून श्रीवर्धन शिवाजी चौक ते गोखले कॉलेज प्रभात फेरी काढली. फेटा बांधून पारंपरिक वेष परिधान करून महिलांनी दुचाकीवरून काढलेल्या फेरीचे सर्वांनीच कौतुक केले आहे. श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर, हवालदार राजेंद्र पेडवी तसेच इतर पोलिस कर्मचारी सदर प्रसंगी उपस्थित होते.
एस एन डी टी महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. डॉक्टर चित्रा ढवळे यांनी उपस्थित सर्व विद्यार्थिनींना आरोग्य आणि महिला या विषयी संबोधित केले. एस एन डी टी महाविद्यालयाचे समन्वयक अनिल वाणी व इतर शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थिनी सदर कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते.