कोंझरी बौद्धवाडी येथे श्रमदानातून नदीवर बांधला वनराई बंधारा
रायगड वेध श्रीकांत बिरवाडकर म्हसळा
म्हसळा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कोळे हद्दीतील कोंझरी बौद्धवाडी येथे रविवारी स्थानिक ग्रामस्थ व मुंबईकर मंडळी यांचे सहकार्याने श्रमदान करून नदीवर बंधारा बांधण्यात आला आहे.
सध्या उन्हाळा वाढत चालला असून मानव जातीपासून सर्वच सजीव जीवांना या कडक उन्हाचा त्रास जाणवू लागला आहे. माणसाबरोबर पाळीव व वन्य प्राण्यांना सुद्धा उन्हाचे चटके सोसावे लागत असून पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. अनेक ठिकाणी पाण्याची कमतरता जाणवू लागली आहे त्यातच ज्या ठिकाणी पाण्याचे स्रोत उपलब्ध आहेत ते जतन करून ठेवणे काळाची गरज वाटू लागली आहे. पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना लक्षात घेऊन काही स्वयंसेवी संस्था, तरुण मंडळे, ग्रामस्थ मंडळी नदीला वनराई बंधारे बांधत आहेत. प्रामुख्याने पाण्याची वाढती गरज लक्षात घेता, भीषण भासणारे उन्हाचे चटके, जनावरांना लागणारे पिण्यासाठी पाणी यावर उपाय म्हणून कोंझरी बौद्धवाडी येथील नदीवर बंधारा घालण्यात आला.
सदर बंधाऱ्याचे काम करतेवेळी म्हसळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरवठणे गण अध्यक्ष तथा पंचक्रोशी पदाधिकारी सतिश शिगवण यांसह मुंबईकरांचे विशेष सहकार्य लाभले. मुंबईतून रोहित जाधव, कुणाल जाधव, प्रसाद बुधकर, सचिन बुधकर, साळवी, रामजी जाधव, श्याम जाधव, दोन चिमुकले स्वरा शिगवण व प्रद्युम्न बुधकर या सर्वांनी विशेष मेहनत घेऊन बंधारा बांधला. या लोकोपयोगी कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
"प्रामुख्याने पाण्याची वाढती गरज लक्षात घेता, भीषण भासणारे उन्हाचे चटके तसेच पाळीव व वन्य जनावरांना लागणारे पिण्यासाठी पाणी यावर उपाय म्हणून कोंझरी बौद्धवाडी येथील नदीवर बंधारा घालण्यात आला.
श्री.सतिश शिगवण
म्हसळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वरवठणे गण अध्यक्ष