• दिवेआगर येथील कासव महोत्सवाला पर्यटकांचा उस्फुर्त प्रतिसाद.
• पर्यटन राज्यमंत्री तथा रायगड पालकमंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती
रायगड वेध मेघ वैभव तोडणकर आदगाव
श्रीवर्धन तालुक्यातील निसर्गरम्य दिवेआगर येथील समुद्रकिनारी वन विभाग रोहा, सह्याद्रि निसर्ग मित्र चिपळूण व ग्रामपंचायत दिवेआगर यांच्या संयुक्त विद्यमाने गेली पंधरा ते वीस वर्षांपासून सुरू असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या सागरी कासव संरक्षण व संवर्धन कार्यक्रमांतर्गत कासव महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्यमंत्री तथा रायगड पालकमंत्री आदिती तटकरे यांनी आवर्जून उपस्थित राहून संरक्षीत केलेल्या कासवांच्या पिल्लांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात जीवन प्रवासासाठी मार्गस्थ केले.
दरवर्षी नोव्हेंबर ते मार्च महिन्यात समुद्री कासवांच्या मादी समुद्रकिनारी अंडी सोडण्यासाठी येतात. यावर्षीच्या हंगामात आजपर्यंत पाच घरट्यांमध्ये ६४७ अंडी मिळाली असून त्यांचे संवर्धन व संरक्षण वन विभाग, सह्याद्री निसर्ग मित्र व दिवेआगर ग्रामपंचायत यांच्या कडून करण्यात आले आहे.
या महोत्सवाने दुर्मिळ अशा या समुद्री कासवाचे संरक्षण व संवर्धन तसेच या भागांतील पर्यटन वाढीसही उत्तम संधी उपलब्ध होऊन दुहेरी हेतू साध्य होत आहे. समुद्री कासव संवर्धनासाठी श्रीवर्धनचे वनक्षेत्रपाल मिलिंद राऊत, बोर्ली पंचतनचे वनपाल सुनिल गुरव, वनरक्षक दिनेश गिऱ्हाने , वनरक्षक शेख बुरान शेख इसा , कासव रखवालदार मंगेश पडवळ, संतोष गुरव यांनी मोलाची भूमिका पार पाडली.
या समुद्र कासव महोत्सव प्रसंगी प्रांताधिकारी अमित शेडगे, तहसीलदार सचिन गोसावी, दिवेआगर सरपंच उदय बापट, सिद्धेश कोसबे, ग्रामस्थ व शेकडो पर्यटक उपस्थित होते.