• भाएसोच्या डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय पोस्टर स्पर्धेत सुयश
रायगड वेध अनिल पवार नागोठणे रोहा
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळातर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन आणि ऑफलाईन पोस्टर स्पर्धेत नागोठणे येथील भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेजमधील इलेक्ट्रिकल विभागाची कु. प्रतिक्षा यशवंत जुईकर व कु.शुभम गायकवाड यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावत आपल्या कॉलेजचे नाव सर्वदूर पसरवले आहे. कांदिवली-मुंबई येथील ठाकूर पॉलिटेक्निक येथे दि. २४ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या तंत्र उत्सव या राज्यस्तरीय आॕफलाईन पोस्टर स्पर्धेत भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेजमधील इलेक्ट्रिकल विभागाची कु. प्रतिक्षा यशवंत जुईकर व कु. शुभम गायकवाड यांनी स्पर्धेतील अभियांत्रिकी आणि विज्ञान तंत्रज्ञान या विषयावर आधारित उत्तमोत्तम पोस्टर काढून या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. यावेळी या दोघांनाही प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
याचबरोबर जालना जिल्ह्यातील अबंड येथील इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग असोसिएशन गव्हरमेंट पाॕलीटेक्निक कॉलेजमध्ये अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दि. १० मार्च रोजी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन पोस्टर स्पर्धेतही कु. प्रतिक्षा यशवंत जुईकर हिने आपला सहभाग नोंदवला होता.या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून या स्पर्धेत देखील कु. प्रतिक्षा हिने यावेळी आयोजकांकडून देण्यात आलेल्या तीन विषयांपैकी स्वातंत्र्यानंतर भारतात अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाची वाढ या विषयावर आधारित उत्तम असे पोस्टर काढले होते. या स्पर्धेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात बाजी मारत प्रतिक्षाने तिसऱ्या क्रमांकाची उपविजेती म्हणून निवड करण्यात आली असून तिला याबद्दल ३०००/- रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आले.दरम्यान कु. प्रतिक्षा हिची या राज्यस्तरीय ऑनलाईन पोस्टर स्पर्धेत सर्वोत्तम २० विद्यार्थ्यांमध्ये निवड होती. तसेच या स्पर्धेत तिने स्वातंत्र्यानंतर भारतात अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाची वाढ या संदर्भात अगदी सहजरित्या चित्र रुपात कागदावर मांडून त्याचा अगदी सोप्या भाषेत व्हिडिओ करुन ऑनलाईन पद्धतीने पाठवला होता.इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख ज्योती पालवे व परिक्षा प्रमुख प्रा.राहुल घरत यांचे कु प्रतिक्षा हिला मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच व्दितीय वर्ष विद्यार्थी निलय शिंगणकर व ऋत्विक म्हात्रे यांनी तिला मदत केली असून प्रतिक्षाने घेतलेल्या मेहनतीच्या जोरावर हे फळ बक्षिस स्वरुपात मिळाले असल्याचे अमरजा लिमये यांनी सांगितले.भाएसो चे संस्थापक किशोर जैन,सीईओ कार्तिक जैन व कॉलेज प्राचार्य प्रविण भारती यांनी आपल्या या दोन्ही पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक करत अभिनंदन केले.