• पारंपरिक पद्धतीने साजरा होणारा तळा शहरातील शिमगोत्सव, गोमुचा नाच आणि शंका सुराचे खास आकर्षण
रायगड वेध श्रीकांत नांदगावकर तळा
कोकणात फाल्गुन शुद्ध पंचमी पासून होळी ला सुरवात होते कोकणात काटेसावरी ची पुष्कळ झाडे असल्यामुळे त्याचा होम आणतात. होळी लावण्याच्या प्रथा वेगवेगळ्या आहेत तळा येथे सावरीच्या होमाला पिलु म्हणतात. पहिले पिलु ते पूर्णिमेचा होम यांची उंची वाढत जाते. पिला रचल्यानंतर लहान मुले केंबळी मागावयास जातात. केंबळी म्हणून गावातील लोकांकडून गवत पेंढा किंवा जळाऊ लाकडे दिली जातात केंबळी मागून आल्यानंतर पिला लावला जातो.
चोर हळकुंड
पौर्णिमेच्या आदल्या दिवसाला धवचोल किंवा चोर हळकुंड म्हणतात. या दिवशी गावकरी जंगलात जाऊन होळीसाठी लाकडे तोडून आणतात. तळा येथील चोर हळकुंडाचा सण फार प्रसिद्ध असल्यामुळे गावकरी होळी पौर्णिमेच्या आदल्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात.या दिवशी परगण्यातील प्रत्येक गावातील तमाशा तळा शहरात येतो. प्रत्येक घरोघरी तमाशाचा नाच होतो. गोमूची भूमिका एक पुरुष करतो. गोमू कशी सजली, साडीचा रंग,डिजाईन, केसांची रचना, तोंडाची रंगरंगोटी, नकली दागदागिने या सर्वच गोष्टींचे कुतूहल असते.त्यांच्याबरोबर असलेला गाणारा वाजवणारा आणि त्यांचे साथीदार या सर्वांच्या कालागुणांवर बिदागी अवलंबून असते. गावातील कवी कवने,लावण्या व होळीची गीते तयार करतात. शिमग्याला नाचाला देण्यात येणारा पोस्त कधीही भार वाटत नाही. तो त्यांचा हक्क असल्यासारखा बाजूला काढून ठेवला जातो. तळा शहराची ग्रामदेवता श्री चंडिका देवीचे मूळ स्थान तळेगावच्या कोंडीवर असल्यामुळे तळेगावचा शंकासुर जोगवाडी च्या शंकासुराच्या भेटीस दरवर्षी चोर हळकुंडाच्या दिवशी येतो.बाजारपेठेत बळीच्या नाक्यावर दोघांकडूनही सलामी दिली जाते. ही सलामी बघण्यासाठी फार मोठी गर्दी असते.
दुसऱ्या दिवशी होळी लावण्यासाठी दुपारपर्यंत लाकडे गोळा केल्यानंतर होमासाठी सावरीचे उंच झाड तोडून त्यावरील काटे काढतात. तसेच त्याला नाचत नाचत होळी स्थानावर आणले जाते. आणलेली सर्व लाकडे व आंब्याची टाळी व्यवस्थित रचून त्यावर गवत पेंड यांचे आच्छादन केले जाते. होळी सजवून झाल्यानंतर गावातील महिलांकडून पुरण पोळीचा नैवेद्य दाखवून होळीची पूजा केली जाते तसेच होळीला नवस बोलले जाते व मागील नवस फेडले जाते.होळीत प्रत्येक जण भक्तिभावाने नारळ अर्पण करतात.यानंतर गावातील नागरिक होळीच्या भोवती फिरून देवतांना फाग म्हणत आमंत्रण देतात.फाग म्हणून झाल्यानंतर सामूहिक बोंब मारली जाते.शेवटी गावातील पाच तरुण पाच ठिकाणी ठेवण्यात आलेल्या कापुरावर गवत पेटवून होळी पेटवितात. यामध्ये प्रामुख्याने जोगवाडी येथील होळी लागल्यानंतर सर्व गावांची होळी लागते.
पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता बाजारपेठेतून चंडिका देवीच्या मंदिरात धुळवड काढली जाते.धुळवडीमध्ये कळकीच्या काट्यांचा चुडा बनवून त्यावर फुलांचा तुरा डफावर बांधला जातो. चुडा व होळीची धूळ घेऊन ग्रामस्थ मिरवणुकीने नाचत निघतात.चंडिका देवीचे दर्शन घेऊन धुळवड आल्या मार्गे परत जाऊन होळीच्या स्थानावर सांगता होते.