श्रीवर्धन मध्ये अखेर संजय गांधी निराधार समिती स्थापन
अध्यक्ष पद्दी संदेश काते यांची नियुक्ती
रायगड वेध श्रीकांत शेलार दांडगुरी
गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेल्या संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी वावेपंचतन येथील संदेश काते यांची नियुक्ती झाली. सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी व्यक्ती म्हणून पालकमंत्री अदिती तटकरे यांनी त्यांचं नाव सुचवले असून याबाबतचे जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचे अधिकृत पत्र प्राप्त झाले आहे.
राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर या समितीत बदल होणार हे निश्चित होते; मात्र समितीचे अध्यक्षपद आघाडीतील कोणत्या घटक पक्षाकडे जाते याची उत्सुकता होती. अध्यक्षपदासाठी अनेक इच्छुक असल्याने नियुक्ती लांबली. अखेर पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या शिफारशीनंतर जिल्हाधिकारी यांनी समिती जाहीर केली. समितीत काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे.
संजय गांधी योजने अंतर्गत विधवा महिला, अपंग किंवा निराधार व्यक्तींना दरमहा शासना मार्फत विविध प्रकारच्या पेन्शन योजनेचा लाभ देण्यात येतो. यासाठी पदसिद्ध शासकीय अधिकाऱ्यांसोबतच अशासकीय सदस्यांची निवड केली जाते. श्रीवर्धन तालुक्यासाठी गठीत करण्यात आलेल्या संजय गांधी समिती मध्ये अध्यक्षपदी संदेश काते यांचेसह सदस्य म्हणून दिघी येथील चंद्रमणी मोरे, बोरलीपंचतन च्या माजी सरपंच नम्रता निवास गाणेकर, शिस्ते येथील माजी सरपंच रमेश घरत, रानवली येथील सुरेश मांडवकर, आदगाव येथील नंदकुमार रघुवीर, वडवली येथील रेखा संतोष भायदे, सुकृत कोलथरकर व श्रीवर्धन येथील योगेश गंद्रे यांची यांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. शासकीय प्रतिनिधी म्हणून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तर सदस्य सचिव म्हणून तहसिलदारांची शासकीय सदस्य म्हणून निवड जाहीर झाली आहे.
अपंग प्रतिनिधी कुणीच नाही
- संजय गांधी निराधार समितीमध्ये अपंग प्रवर्गातील अशासकीय प्रतिनिधी म्हणून कुणीही प्रतिनिधी घेतला गेला नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केले जातेय. दिव्यांगांना न्याय देण्यासाठी तालुक्यातील एकतरी अपंग प्रतिनिधी घ्यावा अशी मागणी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे केली जात आहे.