• घुमेश्वर गावात भक्तीमय वातावरणात महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात आला.
● स्वयंभू श्री घुमेश्वर मंदिरास तीर्थक्षेत्र व पर्यटनाचा दर्जा मिळावा - घुमेश्वर ग्रामस्थांची शासनाकडे मागणी
रायगड वेध श्रीकांत बिरवाडकर म्हसळा
रायगड जिल्ह्यामधील म्हसळा तालुक्यातील घुमेश्वर (घुम) गावात नदीच्या काठावर वसलेले आणि प्राचीन काळापासून ऐतिहासिक महत्व असलेल्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्र स्वयंभु श्री घुमेश्वर मंदिरात सालाबादप्रमाणे मंगळवार, दि.१ मार्च २०२२ रोजी भक्तीमय वातावरणात महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात आला.
महाशिवरात्री उत्सवाच्या शुभमुहूर्तावर घुमेश्वर गावातील स्वयंभू श्री घुमेश्वर मंदिरास तीर्थक्षेत्र व पर्यटनाचा दर्जा देऊन भाविकांसाठी वेगवेगळ्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी घुमेश्वर ग्रामस्थांनी शासनाकडे केली आहे.
महाशिवरात्री निमित्त भक्तिमय वातावरणात पहाटे महादेवाच्या पिंडिवर अभिषेक करण्यात आला नंतर गावातून भव्य पालखी मिरवणूक लेझीम, टाळ व मृदंगाच्या गजरात मंदिरापर्यंत दिंडी काढण्यात आली. गावात सर्वांच्या घरोघरी पालखी नेऊन दर्शन घेण्यात आले व या मिरवणुकीत महिला, पुरुष, तरुण लहान मुले सर्वजण तल्लीन होऊन नाचत उत्सवाचा आनंद लुटला. मंदिराच्या भव्य प्रांगणात भाविकांच्या मनोरंजनासाठी श्री हेरंब भजन मंडळ विरार - नालासोपारा यांचा हरिपाठ व भजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. या कार्यक्रमाच्या माध्यमातून भाविक भक्त मंत्रमुग्ध झालेले दिसून येत होते. सायंकाळी आरती करून महाशिवरात्री उत्सवाची सांगता करण्यात आली.
पहाटेपासून पिंडीवर अभिषेक, पालखी मिरवणूक सोहळा, हरिपाठ, भजन, आरती, अशा विविध कार्यक्रमांनी महाशिवरात्री उत्सव साजरा साजरा करण्यात आला.
महाशिवरात्री उत्सवा निमित्ताने पंचक्रोशीतील व तालुक्याच्या बाहेरून देखील मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांनी उपस्थित राहून स्वयंभू श्री घुमेश्वराचे दर्शन घेऊन तीर्थ प्रसादाचा लाभ घेतला आणि आपआपले गाऱ्हाणे स्वयंभू श्री घुमेश्वराकडे मांडले. घुमेश्वर ग्रामस्थ व महिला मंडळ आणि मुंबई मंडळ, युवक वर्ग सर्वांच्या सहकार्याने महाशिवरात्री उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला.