• बोर्ली पंचतन येथे महा आरोग्य शिबीर संपन्न
रायगड वेध अभय पाटील
बोर्ली पंचतन ही श्रीवर्धन तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असले तरी बोर्ली पंचतन विभाग आरोग्य सेवेच्या दृष्टीने अद्याप मागासलेलाच असणे ही मोठी शोकांतिका आहे असे परखड मत डॉ. राजेश पाचारकर यांनी व्यक्त केले. बोर्ली पंचतन येथे अखंड आगरी समाज व डॉ. राजेश पाचारकर मित्र मंडळ बोर्ली पंचतन यांच्या संयुक्त विद्यमाने महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
बोर्ली पंचतन हे रायगड जिल्ह्यातील अगदी दक्षिण टोकाला असलेले श्रीवर्धन तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे. आरोग्य सेवेच्या बाबतीत श्रीवर्धन तालुक्यातील रुग्णाला महाड, माणगाव किंवा मुंबई येथे जावे लागते. बोर्ली पंचतन गावचे सुपुत्र डॉ. राजेश पाचारकर यांच्या माध्यमातून या भागामध्ये नेहमीच आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येते. आज रविवार, २७ मार्च रोजी श्री मोहनलाल सोनी विद्यालयामध्ये अखंड आगरी समाज बोर्ली पंचतन व डॉ. राजेश पाचारकर मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्धाटन प्रसंगी उद्योगपती महमद मेमन, शिक्षण महर्षी रवींद्र कुळकर्णी, अखंड आगरी समाज अध्यक्ष चंद्रकांत धनावडे, उपाध्यक्ष कृष्णकांत पाटील, सचिव प्रशांत पाटील, खजिनदार राजेंद्र पयेर, चिंचबादेवी देवस्थान संस्था अध्यक्ष सुजित पाटील, खजिनदार शंकर गाणेकर, महिला मंडळ माजी अध्यक्ष वैशाली पयेर, सुप्रिया पाटील, गावपाटील शरद पाटील, समीर पाटील, दत्ताराम पाटील, नरेश पाटील, नरेश पयेर, माजी सरपंच गणेश पाटील, संतोष गायकर, डॉ. पाचारकर मित्र मंडळ सदस्य व रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिरामध्ये बालरोग तज्ञ, त्वचा रोग तज्ञ, अस्थीरोग तज्ञ, हृदय रोग तज्ञ, जनरल सर्जन डॉकटारांच्या सेवेचा लाभ परिसरातील ८०० पेक्षा जास्त रुग्णांनी लाभ घेतला. या शिबिरासाठी डॉ. शलाका पाटील, डॉ. आबासाहेब पाटणकर, डॉ. श्रीकांत रानडे, डॉ. सचिन मेहता, डॉ. प्रिती पाथरे, डॉ. मनिषा देवरे, डॉ. सचिन कोल्हे, सुनील नांदगावकर, डॉ. आदित्य महामणकर, डॉ. आकाश परब, डॉ. सोनावणे, डॉ. संजय ससाणे, डॉ. स्नेहा मोरे यांनी शिबिरामध्ये आलेल्या रुग्णांना तपासून योग्य उपचारासाठी सल्ला दिला. या शिबीराच्या उदघाटन प्रसंगी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष महंमद मेमन म्हणाले की, आपण डॉक्टर रुपात सेवा देताना उत्तम सेवा देत असता आज शिबीराच्या माध्यमातून आपण गरीब जनतेची सेवा करीत येथूनही आशीर्वाद घेऊन जाणार आहात, असे म्हणाले. तर डॉ. राजेश पाचारकर म्हणाले की, बोर्ली पंचतन हे श्रीवर्धन तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे परंतु येथे आरोग्य सेवा अजिबात नाहीत किंबहुना त्या सुधारण्यासाठी कोणी प्रयत्न करीत नाहीत ही शोकांतिका आहे. त्यामुळे शिबीराच्या माध्यमातून आपल्या गावात चांगले सुप्रसिद्ध डॉक्टर आणुन आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न असल्याचे म्हणाले.