• कुडगाव व मोर्बा घाटात संरक्षण कठड्याची मागणी
• माणगाव - दिघी या नवीन रस्त्यामुळे वाहनांचा वेग वाढला
रायगड वेध रमेश घरत शिस्ते
माणगाव - दिघी मार्गावरील कुडगाव ते वेळास भरणा नाका व मोर्बा येथील वळणदार घाटात संरक्षक कठडे नसल्याने येथून जाताना वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन जावा लागतो. त्यामुळे वळणाकृती रस्त्याच्या दुतर्फा संरक्षण कठडे बांधणे गरजेचे आहे. दिघी बंदरात मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना याचा अंदाज येत नसल्याने एखादी मोठी दुर्घटना होऊ शकते. घोणसे घाट येथे वळणावर दर पंधरा दिवसांत अपघात घडत आहेत.
श्रीवर्धन तालुका हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. दिघी येथून थेट जंजिरा केला तसेच फेरी बोटीने मुरुड व अलिबाग याठिकाणी जाता येते. याशिवाय दिघी बंदरातून कमी अधिक प्रमाणात मालवाहतूक होत असते त्यामुळे या रस्त्यावर नेहेमीच वाहनांची वर्दळ असते. ठिकठिकाणी दुचाकी-चारचाकी वाहनांना वळणे घेत असताना गाडीचा ताबा सुटण्याची शक्यता अधिक असते. या मार्गावरून येत असताना वाहने अतिशय धोकादायक वळणे घेत असताना दिसून येतात.
सध्या महाराष्ट्र रस्ते विकास मंडळाकडून दिघी ते माणगाव या रस्त्याचे काँक्रीटीकरण होत असून काम अंतीम टप्प्यात आले आहे. काही ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्यात आली आहे मात्र काही वळणावर तातडीने संरक्षण कठडे बसविणे गरजेचे आहे; अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मोर्बा घाट हा महत्त्वाचा मार्ग असून, याठिकाणी तातडीने संरक्षण कठडे नसल्याने हा मार्ग धोकादायक बनला आहे. याबाबत अधिक माहितीसाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे अभियंता सचिन निफाडे यांच्या शी संपर्क केला असता संपर्क झाला नाही.
माणगाव कडून दिघी पोर्ट कडे जाणाऱ्या मार्गावरील सर्वच वळणांवर संरक्षक कठडे बसविणे गरजेचे आहे. वेळास भरणे नाका येथे गाडीवरील ताबा सुटल्यास वाहन थेट दरीत कोसळून मोठी दुर्घटना होऊ शकते.
- चंद्रकांत चाळके, सरपंच - शिस्ते