वणव्यामुळे वनसंपदेचे अतोनात नुकसान ,तर वन्यजीवांचा अधिवास धोक्यात ...!
अनेकवेळा मुद्दाम लावले जात आहेत हे वणवे
रायगड वेध अनिल पवार रोहा
उन्हाळा तीव्र होत असून, मार्च महिन्यातील वाढत्या तापमानामुळे पारा चाळीस अंशाकडे झुकला आहे. त्यातच यंदाच्या वर्षीच रोहा तालुक्यातील डोंगर-टेकड्यांवर वणवे लागण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. यामुळे वनसंपदा व वन्यप्राण्यांचे देखील होरपळून मोठे नुकसान होत आहे. रोहा तालुक्यातील डोंगर-टेकड्या काळवंडल्या आहेत. काही ठिकाणी नैसर्गिकरित्या अज्ञानातून, तर काही ठिकाणी मुद्दाम वणवे लावले जात आहेत. पर्यावरणाच्यादृष्टीने वणवे रोखण्यासाठी वन विभागाने कडक पावले उचलणे गरजेचे आहे.
आतापर्यंत रोहा तालुक्यातील नागोठणे परिसरातील डोंगर भागात तसेच सुकेळी, कोलाड परिसरातील डोंगर भागात वणव्यांचे प्रकार घडले असतानाच गेली दोन-तीन दिवसांपासून नागोठणे रेल्वे स्थानकाच्या वरच्या बाजूस असलेल्या श्री जोगेश्वरी मातेच्या मंदिराच्या भोवतालच्या डोंगर भागात लागलेल्या वणव्यात वनसंपदेचे अतोनात नुकसान होत असून या भागात वास्तव्यास असलेल्या वन्यजीवांचा अधिवास धोक्यात आला असल्याचे दिसून येते. येथील लागलेल्या वणव्यांमुळे डोंगर-टेकड्या ही उघडी बोडकी झाली आहेत. शेळ्या-मेंढ्यांसह जनावरांना वाळका चारासुद्धा शिल्लक राहिला नाही. दोन वर्षापासून समाधानकारक पडलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर गवत वाढले आहे. यामध्ये मुख्यतः पांढऱ्या आणि काळ्या कुसळांच्या गवताचे प्रमाण अधिक आहे. ते अधिक ज्वलनशील असल्याने ठिणगीच्या संपर्कात आले, तर ताबडतोब पेट घेते. बघता-बघता आग वाऱ्याच्या गतीने पसरून होत्याचे नव्हते होते.
रोहा तालुक्यातील काही भागात जाणून-बुजून वणवे लावले जात असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांकडून केल्या जात आहेत. वारंवार लागणाऱ्या वणव्यांमुळे अमूल्य वनसंपदा त्याचबरोबर औषधी वनस्पतींचे नुकसान होऊन वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या वणव्यात मोठे वृक्षही होरपळून जात आहेत. वन विभागाने आणि सामाजिक संस्थांनी तसेच शासनाने केलेल्या वृक्ष लागवडीचेही वणव्यामुळे नुकसान होत आहे. वृक्ष लागवड अभियानातील चांगली वाढलेली झाडे वणव्याच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत. वणव्यांमुळे वन्यजीवांचा अधिवास धोक्यात येत आहे. अनेक छोटे-मोठे वन्यजीव आगीत सापडून होरपळले जात असल्याने जीवसृष्टीच्या चक्रातून गंभीर परिणाम होत आहेत. त्यामुळे कित्येक वन्यजीव गावाकडे धाव घेत असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. सद्यस्थितीत तालुक्यातील डोंगरावरही वणवे लावण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र काही वनमित्र तसेच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी वनसंपदेचे रक्षण व्हावे या हेतूने वणवा विझविण्याचा प्रयत्न करताना दिसतात.
अनेकवेळा हे वणवे मुद्दाम लावले जात आहेत
डोंगर-टेकड्यांवरील वणवा रात्रीच्या वेळी खूप छान दिसतो, म्हणून फोटो काढण्यासाठी वणवे लावणारे बहाद्दरही आहेत. पुढीलवर्षी पावसाळ्यात चांगले गवत यायचे असेल, तर आताचे जाळावे लागते, असा गैरसमज पसरल्यानेही वणवे लावले जात आहेत. सिगारेटच्या अर्धवट जळालेल्या थोटक्यानेही मोठे वणवे लागत आहेत. अजाणतेपणी किंवा मुद्दाम लावलेल्या वणव्यांनी वन्यजीवसृष्टीचे मात्र मोठे नुकसान होत आहे.
सातत्याने लागणाऱ्या या वणव्यांवर वन विभागाने नियंत्रण आणणे गरजेचे आहे. यासाठी रोहा तालुक्याच्या प्रत्येक गावातून जनजागृती व्हायला हवी. वेगवेगळ्या समित्या स्थापन करून, त्यांंच्या माध्यमातून वणवे रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायला हवेत, तरच आगीच्या भक्ष्यस्थानी पडणारी वनसंपदा वाचण्यास मदत होईल. अन्यथा, पर्यावरणाचे नुकसान असेच होत राहील
- भरत गिते, पर्यावरण प्रेमी
काही दिवसांपासून डोंगर भागात आणि टेकडीवर वणवा लागण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले असतानाच गेली दोन-तीन दिवसांपासून नागोठणे येथील डोंगरा कोणी तरी अज्ञात व्यक्तींकडून वेगवेगळ्या ठिकाणी वणवा लावण्याचे दुष्कृत्य होत आहे. मात्र दोन दिवसांपासून मी स्वतः आणि नागोठणे वनविभागाचे कर्मचारी डोंगरावर लागलेल्या वणवा विझवण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहोत.
- किरण ठाकूर
परिक्षेत्र वन अधिकारी नागोठणे.