• कुडतुडी गवळवाडी गावात उभे राहिले माणुसकीचे घर
● रायगड भूषण समाजसेवक कृष्णा महाडिक यांचा पुढाकार
● निराधार महिलेला मिळवून दिला निवाऱ्याचा आधार
● परराज्यातूनही मिळाली मदत निधी
रायगड वेध श्रीकांत बिरवाडकर म्हसळा
म्हसळा तालुक्यातील कुडतुडी गवळवाडी गावातील श्रीमती शेवंती पांडूरंग गायकर या गरीब निराधार वयोवृद्ध महिलेला रायगड भूषण समाजसेवक कृष्णा महाडिक यांच्या प्रयत्नातून घर (निवारा) बांधून दिले आहे.
दि.03 जून 2020 रोजी दक्षिण रायगड मध्ये झालेल्या चक्रीवादळामुळे शेवंती गायकर यांचे राहते घर संपूर्ण पडून उध्वस्त झाले होते. गेली दिड वर्ष या महिलेला सरकार कडून व अन्य लोकांकडून काहीही मदत मिळाली नाही. पतीच्या मृत्यू नंतर निराधार महिलेला डोक्यावर छप्पर नसल्याने दैनंदिन जीवन जगणे खडतर झाले होते. अशा वेळी भारत सर्व धर्म समभाव आहे याची जाणीव झाली.
रायगड भूषण पुरस्कार प्राप्त समाजसेवक कृष्णा महाडिक यांच्या संपर्कातून भारतातील सगळ्या धर्मातील लोकांनी व वेगवेगळ्या राज्यांतून दानशूर समाजसेवकांनी आपापल्या परीने मदतीचा हात पुढे केला. यामध्ये हिंदू, मुस्लिम, जैन, पारसी, गुजराती लोकांनी तर कोकण, महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, राजस्थान, दिल्ली, हरियाणा इ. राज्यांतून मदत मिळाली.
उपलब्ध निधितून घराचे भूमीपुजन म्हसळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उद्धव सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आले होते आणि गृहप्रवेश उद्योगपती विजय नागरथ, उद्योगपती कमलेशभाई मेहता व मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटातील सिनेकलाकार भोमी धोतीवाला (पप्पा) यांच्या हस्ते सदर घरकुलाचा उद्घाटन रविवारी करण्यात आले.
घराचे उद्घाटन प्रसंगी गावातील ग्रामस्थ रमेश कासार, रमेश दिवेकर, प्रकाश धुमाळ, विनोद लाड यांसह महिला, युवक उपस्थित होते.
या सुंदर वास्तूचे काम मुंबई नालासोपारा येथील मेस्त्री अनंत पांचाळ यांनी एका महिन्यात पूर्ण केले. अशा प्रकारे एका गरीब गरजू व निराधार महिलेला कायम स्वरुपी निवाऱ्याची व्यवस्था करून दिल्याने समाजसेवक कृष्णा महाडिक यांचे ग्रामस्थ कुडतूडी, पंचक्रोशी तसेच तालुक्यातून आभार व्यक्त करण्यात येत आहेत.