• सिध्दिविनायक मंदिर समितीवर प्रतिनिधित्व न मिळाल्यास आगरी समाज जनआंदोलन उभारेल! -
आगरी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांचा निर्वाणीचा इशारा
रायगड वेध प्रशांत पोतदार पेण
भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक असलेल्या मुंबईच्या प्रभादेवी येथील श्री सिध्दिविनायक मंदिराची स्थापना १८०१ साली ज्या देऊबाई पाटील या आगरी समाजातील श्रीमंत महिलेने केली. त्या आगरी समाजाच्या मालकीच्या मंदिराच्या व्यवस्थापन समितीवर बाहेरील, परप्रांतिय लोकांना प्रतिनिधित्व देण्यांत आले आहे. पण आगरी समाजाला मात्र हेतुपूर्वक डावळले गेले आहे, ही मोठी विडंबना आहे. याचा समाजाच्या मनात प्रचंड रोष आहे. आगरी समाज नगण्य असल्याचे गृहित धरुनच आतापर्यंत राज्यकर्त्यांनी समाजाला उपेक्षितच ठेवले आहे. म्हणूनच समाजाला ना सत्तेचा वाटा ना आरक्षणाचा लाभ मिळाला. शासनकर्त्यांचा हा आकसभाव समाज यापुढे कदापि सहन करणार नाही.. दोन-अडीच कोटींच्या लोकसंख्येने असलेला देशभरातील आगरी समाज आपल्या न्यायहक्कासाठी आता पेटून उठेल. आणि त्याची चिंगारी विघ्नहर्त्या श्री सिध्दिविनायक गणपती मंदिर व्यवस्थापन समितीवरच्या समाजाचे प्रतिनिधित्व डावळण्याच्या लढ्याने होईल. शासनाने आगरी समाजाच्या अस्मितेचा आणि त्यांच्या आस्थेचा विचार करुन प्रतिनिधित्व न दिल्यास समाजाचे तीव्र जनआंदोलन उभे राहिल, असा निर्वाणीचा इशारा अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना दिला.यावेळी धुरंधर मढवी - सहखजिनदार, व्दारकानाथ वर्तक, गजानन भाईर, पी.वाय.पाटिल, सुभाष म्हात्रे, प्रकाश माळीआदी उपस्थीत होते