Type Here to Get Search Results !

• जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या तातडीच्या निर्णयामुळे बालविवाह रोखण्यात जिल्हा प्रशासन यशस्वी• बालविवाहासारख्या अनिष्ट प्रथांना बळी न पडण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन…!


• जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या तातडीच्या निर्णयामुळे बालविवाह रोखण्यात जिल्हा प्रशासन यशस्वी

• बालविवाहासारख्या अनिष्ट प्रथांना बळी न पडण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन…!


रायगड वेध निलेश मयेकर अलिबाग


 जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या तातडीच्या निर्णयामुळे मुरुड तालुक्यातील मौजे भोईघर येथील टेंभोंडे आदिवासीवाडी येथे होणारा बालविवाह रोखण्यात जिल्हा प्रशासनाला यश मिळाले. या घटनेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर यांनी जनतेला आवाहन केले आहे की, बालविवाहासारख्या अनिष्ट प्रथांना बळी पडू नका. जिल्ह्यातील कातकरी आदिवासी बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांना सर्व प्रकारचे शासकीय लाभ, दाखले मिळवून देण्यासाठी, आरोग्य सोयी सुविधा मिळवून देण्यासाठी, त्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी, त्यांचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या पुढाकारातून कातकरी उत्थान अभियान व सप्तसूत्री कार्यक्रम सर्व स्तरांवरून राबविण्यात येत आहे.
     जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांना दि.21 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 08.00 वाजताच मौजे भोईघर येथील टेंभोंडे आदिवासीवाडी येथे बालविवाह होत असल्याची माहिती मिळाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी तातडीने मौजे भोईघर येथील टेंभोंडे आदिवासीवाडी येथे जाण्याबाबत व संबंधितांचे प्रबोधन करून हा बालविवाह रोखण्याच्या दृष्टीने यंत्रणेला आवश्यक ते निर्देश दिले.
     त्याप्रमाणे उपविभागीय अधिकारी अलिबाग श्री.प्रशांत ढगे व मुरुड तहसिलदार श्री.रोहन शिंदे यांनी तात्काळ मुरुड तालुक्यातील निवासी नायब तहसिलदार श्री.रविंद्र सानप, भोईघर तलाठी अमृत चोगले यांना घटनास्थळी तात्काळ पाठविले. भोईघर गावचे सरपंच श्री.काशिनाथ वाघमारे व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी चौकशी केली असता टेंभोंडे आदिवासीवाडी येथे दुपारी 2.00च्या सुमारास कु.राणी वाघमारे, वय 15 रा. टेंभोंडे व कु.शांताराम लक्ष्मण जाधव, वय 17, रा.साळाव आदिवासीवाडी संजयनगर यांचा बालविवाह होणार असल्याची माहिती मिळाली. माहितीची खातरजमा केल्यानंतर स्थानिक प्रशासनातील निवासी नायब तहसिलदार श्री.रविंद्र सानप, भोईघर तलाठी अमृत चोगले, भोईघर गावचे सरपंच श्री.काशिनाथ वाघमारे या सर्वांनी मुलीची आई श्रीमती यमुना लक्ष्मण वाघमारे व त्यांच्या कुटुंबियांचे हा बालविवाह न करण्याबाबत योग्य प्रबोधन व मार्गदर्शन केले.
     त्याचप्रमाणे वर मुलगा मौजे साळाव येथील असल्याने रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.अशोक थोरात, मंडळ अधिकारी श्री.लक्ष्मण शेळके, साळाव तलाठी श्रीमती भावना धोदडे, निडी पोलीस पाटील श्री.नितेश पाटील, साळाव पोलीस पाटील श्री.मेहबूब हुसैन गोरमे व साळाव ग्रामपंचायत सदस्य राजू वाघमारे, साळाव सरपंच निलम पाटील, ग्रामस्थ श्री.नरेश वाघमारे या सर्वांनी मौजे साळाव येथेच मुलाचे वडील श्री.लक्ष्मण जाधव व त्यांच्या कुटुंबियांचे प्रबोधन व मार्गदर्शन करुन बालविवाह रोखला. यावेळी या दोन्ही कुटुंबांकडून हा बालविवाह करणार नसल्याची लेखी हमीही घेण्यात आली.
     अशा प्रकारे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने केलेल्या तात्काळ कार्यवाहीने हा बालविवाह यशस्वीपणे रोखण्यात आला. तसेच संबंधित दोन्ही कुटुंबांचे प्रबोधन करून बालविवाहसारख्या अनिष्ट प्रथेबद्दल जनतेमध्ये जागरूकता वाढविण्यासाठी पाऊल उचलले गेले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test