Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील घुम-रुद्रवट गावांचे मंजूर मुख्य रस्त्याचे काम रखडले● मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील कामाची ऐशी की तैशी...!

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील घुम-रुद्रवट गावांचे मंजूर मुख्य रस्त्याचे काम रखडले

● मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील कामाची ऐशी की तैशी...!

● 15 वर्षांपासून नागरिक चांगल्या रस्त्याच्या प्रतीक्षेत

◆ रस्ते विकास ठेकेदारांच्या दिरंगाईमुळे नागरिकांना सहन कराव्या लागतात यातना 

◆ सुप्रभात इन्फ्राझोन प्रा.लि.कंपनीने घेतला आहे कामाचा ठेका

● आमदार, खासदारांसह लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची मागणी 


रायगड वेध श्रीकांत बिरवाडकर म्हसळा


   राज्यातील मागील भाजप सरकारच्या काळात रायगड जिल्ह्यात काही तालुक्यातील अनेक गावातील जोड रस्त्यांच्या कामांना मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजुरी मिळाली आहे. म्हसळा तालुक्यातील देखील काही गावातील जोडरस्त्यांना मुख्यमंत्री सडक योजनेतून मान्यता मिळाली आहे परंतु ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे व या योजनेशी संबंधित असलेल्या अधिकारी वर्गाच्या दुर्लक्षित भूमिकेमुळे रस्त्यांच्या दुरुस्ती कामांना विलंब होत आहे व याचा स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
    मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत म्हसळा तालुक्यातील घुम-रुद्रवट (ओडीआर 128 ते पानवे रस्ता) या दोन गावांंसाठी अडीच वर्षांपूर्वी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून नवीन रस्त्याचे कामाला एक कोटीच्या निधीची मंजुरी मिळाली आहे. मागील दोन वर्षांपूर्वी रस्ता विकास कामाचा ठेका मयुरी कॅट्रक्शन, तुर्भे नवी मुंबई यांचे नावे घेतलेला असुन तो तयार करण्यासाठी अन्य एका पोट ठेकेदाराकडे वर्ग केला होता. संबंधित ठेकेदाराकरवी रस्ता दुरुस्ती व सुधारणा कामात खुपच दिरंगाई केल्याने त्या ठेकेदार कंपनीला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकून त्या कंपनीकडून हे काम काढून घेण्यात आले आहे अशी माहिती संबंधित अधिकारी वर्गाकडून व लोकप्रतिनीधिंकडून मिळाली आहे.
 जानेवारी 2019 मधे घुम -रुद्रवट रस्त्याचे दुरुस्ती कामाला सुरूवात करावयाची होती परंतु ठेकेदाराने कामात दिरंगाई केली असून नवीन रस्ता तर झालाच नाही परंतु जो रस्ता होता त्याच्या दोन्ही बाजूला साईड पट्टी खोदून ठेवल्याने मोठमोठे खड्डे पडले आहेत.
 त्याचबरोबर गावांना जोडणारा नदीवरील मुख्य साकव दुरुस्ती साठी तोडला होता त्याचीही डागडुजी अर्धवट ठेवली आहे. 
रस्ता चांगल्या प्रकारे दुरुस्ती झाला नाही तर येथे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. घुम फाटा ते रुद्रवट गावापर्यंत हा रस्ता तर झालाच नाही शिवाय नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळून रस्त्याचे दोन्ही बाजूला खोदून काम अर्धवट ठेवल्याने तालुक्यातील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील मंजूर कामाची "ऐशी की तैशी" करून टाकली असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
   पहिल्या ठेकेदाराने रस्ता दुरुस्तीचे अन्य कोणतेही काम न करता फक्त नदीवरील साकव बांधला असून तो साकवही अपूर्णच आहे.
15 वर्षांपासून चांगल्या रस्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या घुम फाटा ते रुद्रवट गावापर्यंत मंजूर रस्त्याचे काम रखडले असून रस्ते विकासक कामांचे ठेकेदाराचे दिरंगाई व मनमर्जी कारभारामुळे नागरिकांना अतोनात यातना सहन कराव्या लागत आहेत. निवडणुका जवळ आल्या किंवा अन्य काही कार्यक्रम असले की रस्त्याचे कामाला आज ना उद्या सुरुवात होईल असे सहानुभूती पूर्वक उत्तर अनेकांकडून ऐकायला मिळतात असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
    घुम, रुद्रवट या दोन्ही गावातील आजारी, वयोवृद्ध नागरिक, विद्यार्थी, दैनंदिन कामासाठी प्रवास करणारे प्रवाशी नागरिक यांना रस्त्याचे काम न झाल्याने खूप त्रास सहन करावा लागत असून नाहक यातना होत आहेत.   
मागील 15 वर्षांपासून घुम रुद्रवट रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्याचे दुरवस्था बाबत अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या असून याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.
     रस्ता पूर्णपणे उखडला असून मोठमोठे खड्डे पडले आहेत तर काही ठिकाणी दगड गोटे निघाले असून लाल माती बाहेर आली आहे, रस्त्याला वेडी वाकडी वळणे असल्याने व रस्ता चढ - उतार भागाचा असल्याने अनेक ठिकाणी बारीक रेती सदृश्य खडी माती जमा झाली आहे. या खडी मातीवरून अनेक वेळा मोटारसायकल स्वार, तरुण पडून जखमी झाले आहेत. तर अन्य वेगवेगळ्या अपघातांना सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावरून गाडी चालविणे तर सोडाच पण पायी चालणे सुद्धा अवघड होऊन बसले आहे, गावातील आजारी माणसे, विद्यार्थी, गरोदर महिला, वयोवृद्ध नागरिक कसेबसे या रस्त्यावरून प्रवास करीत आहेत. 

◆ प्रशासकीय अधिकारी अपघात होण्याची वाट बघत आहेत का..?

रस्त्यावरून एखादा मोठा अपघात घडला किंवा कोणा व्यक्तीचे हात पाय तुटून पडले तरच संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांना रस्ता दुरुस्ती करणेचे कामाकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल की काय ? असा सवाल घुम- रुद्रवट गावातील सुजाण नागरिक विचारत आहेत.
----------------

रस्ते विकास ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे रस्ता दुरुस्तीचे काम होत नसल्याने संबंधीत ठेकेदार कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रुद्रवट गावचे तरुण नागरिक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारीश्री.विनोद राटाटे यांनी केली आहे.

घुम गावचे स्थानिक रहिवासी, माजी उपसभापती तथा पं.स.सदस्य मधुकर गायकर यांचे माध्यमातून घुम ग्रामस्थांनी खासदार सुनिल तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांना लेखी निवेदन देऊन त्यांच्याकडे कैफियत मांडुन सदर रस्ता लवकरात लवकर दुरुस्ती करून मिळावा अशी मागणी केली आहे.
-------------
घुम - रुद्रवट गावचे रस्त्याचे डांबरीकरण कामासाठी सुप्रभात इन्फ्राझोन प्रा.ली.अलिबाग या कंपनीने टेंडर भरले असून हे काम त्या कंपनीने घेतले आहे. परंतु अद्याप पर्यंत सुप्रभात कंपनीने कामाची अनामत रक्कम भरलेली नाही त्यामुळे या रस्त्याच्या कामाची वर्क ऑर्डरही दिलेली नाही. कामाचे अनामत रक्कम भरणेसाठी सुप्रभात कंपनीला दि.15 जानेवारी 2021 रोजी लेखी पत्र दिलेले आहे अशी माहिती मुख्यमंत्री ग्राम सडक योजना कार्यालय अलिबाग येथून देण्यात आली आहे.


"घुम - रुद्रवट गावचे रस्त्याचे डांबरीकरण कामासाठी सुप्रभात इन्फ्राझोन प्रा.ली.अलिबाग या कंपनीने टेंडर भरले असून हे काम त्या कंपनीने घेतले आहे. परंतु अद्याप पर्यंत सुप्रभात कंपनीने कामाची अनामत रक्कम भरलेली नाही त्यामुळे या रस्त्याच्या कामाची वर्क ऑर्डरही दिलेली नाही. कामाचे अनामत रक्कम भरणेसाठी सुप्रभात कंपनीला दि.15 जानेवारी 2021 रोजी लेखी पत्र दिलेले आहे."
श्री.विशाल पोईलकर 
इंजिनिअर - म्हसळा तालुका
मुख्यमंत्री ग्राम सडक योजना

● सदर रस्त्याचे कामाबाबत मला योग्य ती माहिती नाही सविस्तर माहिती घेऊन सांगण्यात येईल.
जसवंती आवेरे
असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर
मुख्यमंत्री ग्राम सडक योजना - रायगड जिल्हा

◆ "घुम - रुद्रवट ग्रामपंचायत मार्फत रस्त्याचे काम लवकर सुरू व्हावे यासाठी घुम - रुद्रवट ग्रामपंचायती मार्फत खासदार सुनिल तटकरे साहेब, राज्यमंत्री तथा पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे साहेबांना लेखी निवेदन दिले आहेत. हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावा अशी मागणी आहे."
श्री.केतन आग्रे
सरपंच - घुम-रुद्रवट ग्रामपंचायत

● घुम रुद्रवट रस्ता अतिशय खराब झाला असून नागरिकांचे येता जाता हाल होत आहेत. ज्या ठेकेदाराने हे काम घेतले आहे त्याने लवकरात लवकर काम सुरू करण्याची प्रक्रिया करावी. तसेच खासदार सुनिलजी तटकरे साहेबांनी या कामी विशेष लक्ष घालून प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना करून रस्ता लवकर करून द्यावा आणि आमच्या नागरिकांची गैरसोय दूर करावी.
श्री.मयुर मधुकर गायकर
उपसरपंच - घुम -रुद्रवट ग्रामपंचायत


घुम, रुद्रवट गावाचे रस्त्याची झालेली दुरवस्था

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test