Type Here to Get Search Results !

• नागोठण्यातून अवैधरीत्या गोमांस नेणारी टोळी नागोठणे पोलिसांकडून जेरबंद• पोलिस उपनिरीक्षक नारायण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलिसांची धडाकेबाज कामगिरी • आरोपींत नागोठण्यातील तिघांचा समावेश


• नागोठण्यातून अवैधरीत्या गोमांस नेणारी टोळी नागोठणे पोलिसांकडून जेरबंद

• पोलिस उपनिरीक्षक नारायण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलिसांची धडाकेबाज कामगिरी 

• आरोपींत नागोठण्यातील तिघांचा समावेश  


रायगड वेध अनिल पवार नागोठणे रोहा


 जनावरांची हत्या करून त्यांचे मांस नेणारी टोळी काही महिन्यांपासून नागोठणे परिसरात कार्यरत असल्याचे मागील काही महिन्यात वरवठणे आदिवासी वाडी, कडसुरे आणि कुहिरे या ठिकाणी घडलेल्या काही घटनांवरून निदर्शनात आले होते. मात्र या प्रकरणी नागोठणे पोलिसांना गुन्हेगारांचा तपास लागत नसतानाच दि.१६ रोजी नागोठणे आझाद मोहल्ला याठिकाणी कोणतीही आवश्यक ती कागदपत्रे जवळ नसतांना गोवंश जातीच्या प्राण्यांची बेकायदेशीरपणे कत्तल करून ते मांस अवैधरीत्या मुंबई येथे विक्रीसाठी नेणाऱ्या पाच जणांच्या टोळीला नागोठणे पोलिसांनी जेरबंद केले आहे. या पाच आरोपींमध्ये नागोठणे आझाद मोहल्ल्यातील एक जण व मिरानगर येथील दोघांचा समावेश असल्याने परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. याचवेळी नागोठणे पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीचे नागरिकांतून कौतुक करण्यात येत आहे.

या गुन्ह्यात नागोठणे पोलिसांनी सलीम सिंधी, (वय ५२) रा. आझाद मोहल्ला, नागोठणे, इम्रान मुल्ला (वय ३६) व नबाब शेख (वय २३) दोन्ही रा. मिरानगर, नागोठणे, चालक विजय आरोट (वय २५) रा. रमाई कॉलनी, घाटकोपर-मुंबई, नदीम कुरेशी (वय २८) रा. टाटानगर, गोवंडी-मुंबई या पाच आरोपींना गुन्ह्याच्या घटनास्थळावरून नागोठणे पोलिसांनी अटक केले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नारायण चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या कारवाईतील पोलीस पथकात उपनिरीक्षक स्वप्नील सावंत-देसाई, हे.कॉ. नितीन गायकवाड, हे.कॉ. ब्रिजेश भायदे, पो.ना. मिथुन मातेरे, पो.ना. सत्यवान पिंगळे व पो.कॉ. रामनाथ ठाकूर यांचा समावेश होता.    

उपलब्ध माहितीनुसार नागोठणे पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक नारायण चव्हाण हे आपल्या पथकासह शनिवार दि. १५ जानेवारीस नागोठणे परिसरात रात्रीची गस्त घालत होते. गस्त घालत असतांनाच रविवार दि. १६ जानेवारीस पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास नागोठण्यातील आझाद मोहल्ला येथे त्यांना सफेद रंगाची व बंदिस्त बॉडी असलेली पिकअप जीप तसेच सफेद रंगाचा टाटा इंट्रा कंपनीचा छोटा टेम्पो ही दोन वाहने संशयास्पदरित्या आढळून आली. या दोन्ही वाहनांची अधिक तपासणी केली असता त्यामध्ये एकूण ९५० किलो वजनाचे व प्रतिकिलो २०० रुपये प्रमाणे सुमारे १ लाख ९० हजार रुपये किंमतीचे गोवंश जातीच्या प्राण्यांचे तुकडे केलेले मांस आढळून आले. याशिवाय या दोन्ही वाहनांच्या बाजूलाच एक लाल रंगाची लांब शिंगे असलेली गाय, एक काळ्या रंगाची व त्यावर सफेद रंगाचा पट्टा व आखूड शिंगे असलेली गाय, एक काळ्या रंगाची व कपाळावर तोंडाला सफेद रंगाचा पट्टा असलेली उभे शिंग असलेली गाय अशा प्रत्येकी अंदाजे ६ हजार रुपये किंमत असलेल्या व एकूण २४ हजार रुपये किंमतीच्या तीन गायी आढळून आल्या. याशिवाय घटनास्थळी हिरव्या रंगाचा एक इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, एक लोखंडी सुरा व एक स्टीलची मुठ असलेली स्टील सुरी सापडल्याने या तिन्ही गायींचीही कत्तल करण्याची शक्यताही पोलिसांकडून वर्तविण्यात आली. दरम्यान या गुन्ह्यात एकत्रितपणे एकूण ६ लाख ५८ हजार, ७३० रुपयांचा मुद्देमाल नागोठणे पोलिसांनी घटनास्थळी हस्तगत केला आहे.

दरम्यान याप्रकरणी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम सुधारणा अधिनियम २०१५ तसेच भा.दं.वि. व मुंबई पोलीस अधिनियमाच्या विविध कलमांद्वारे आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नारायण चव्हाण हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test