Type Here to Get Search Results !

• फुटबॉल महाराष्ट्र एक्सलन्स सेंटरमुळे जागतिक पातळीवर देशाचा नावलौकिक होईल - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


• फुटबॉल महाराष्ट्र एक्सलन्स सेंटरमुळे जागतिक पातळीवर देशाचा नावलौकिक होईल 
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
 

रायगड वेध अनिल पवार 

       नवी मुंबई येथील फुटबॉल महाराष्ट्र एक्सलन्स सेंटरमुळे जागतिक पातळीवर नावलौकिक मिळविणारा हिंदुस्थानचा संघ तयार होईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केला.
     खारघर,नवी मुंबई येथील फुटबॉल उत्कृष्टता केंद्राचे (Centre of Excellence) उद्घाटन दूरदृश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दि. १६ रोजी संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.
    यावेळी या कार्यक्रमात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड कु.आदिती तटकरे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमल, खासदार तथा ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष व महिला आशिया चषक भारत २०२२ चे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल,खासदार श्रीरंग बारणे, आमदार बाळाराम पाटील, आमदार प्रशांत ठाकूर,आदेशबांदेकर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी हे दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून तर नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग, सिडको चे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.संजय मुखर्जी, सहव्यवस्थापक कैलास शिंदे यांची प्रत्यक्ष उपस्थिती होती.

पुन्हा जोडली जाईल मातीशी नाळ; स्पोर्ट्स सिटीचा उदय
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, तंत्रज्ञान विकसित होत असताना सध्याच्या पिढीची मैदानाशी, मातीशी नाळ तुटत चालली आहे. मात्र या उत्कृष्टता केंद्राच्या माध्यमातून ही नाळ मातीशी पुन्हा जोडली जाईल. आरोग्यदायी जीवनासाठी मैदानी खेळ खेळणे आवश्यक आहे. खारघर येथे निर्माण झालेले हे उत्कृष्टता केंद्र नव्या पिढीसाठी निश्‍चितच उपयुक्त ठरेल. येथे विविध खेळांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी-सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत, याहून अधिक सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. यासाठी नगरविकास विभाग, सिडको यांनी आतापर्यंत केलेले काम निश्चितच अभिनंदनीय आहे.
याचबरोबर खारघर हे शहर भविष्यात "स्पोर्टस् सिटी" म्हणून नावारूपाला येईल, यात शंकाच नाही. या ठिकाणी "सर्व खेळांसाठीच्या आवश्यक सोयीसुविधा एकाच शहरात" ही संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे सांगून शेवटी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी या मैदानात सराव करणारा हिंदुस्थानचा संघ आंतरराष्ट्रीय पातळीवर विजेता संघाच्या रूपात दिसावा, जागतिक पातळीवर हिंदुस्तानच्या संघाचा दरारा निर्माण व्हावा, अशा शुभेच्छा दिल्या.
    
 
    नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री ठाणे श्री.एकनाथ शिंदे यांनी खारघर येथील हे उत्कृष्टता केंद्र एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे,असे सांगून नवी मुंबई शहर हे एज्युकेशन सिटी, आयटी सिटी याबरोबरच आता "स्पोर्टस् सिटी" म्हणूनही ओळखले जाईल, असा विश्वास व्यक्त केला.

नव्या पिढीसाठी पर्वणी
पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी फुटबॉल प्रेमी नव्या पिढीसाठी हे केंद्र एक पर्वणी ठरणार असून येथे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण सोयी-सुविधा दिल्या जाणार आहेत. खारघर, नवी मुंबई, पनवेल हे विविध खेळ व त्या खेळांसाठीच्या सोयीसुविधांचे केंद्रबिंदू होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या केंद्रातून प्रशिक्षण घेतलेले खेळाडू, संघ आपल्या महाराष्ट्राचे व हिंदुस्थानचे नाव मोठे करतील, असे सांगितले.
 
 उत्कृष्टता केंद्र प्रकल्प हा क्रीडा क्षेत्रातील मानाचा केंद्रबिंदू
राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड कु.आदिती तटकरे या म्हणाल्या, नव्या पिढीचा फुटबॉल हा आवडता खेळ आहे. येत्या काळात पनवेल येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे. या पार्श्वभूमीवर या उत्कृष्टता केंद्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या ठिकाणी जागतिक दर्जाच्या स्पर्धा आयोजित होतील. ग्रामीण व शहरी भागातील प्रतिभावंत खेळाडूंसाठी हा प्रकल्प निश्चितच लाभदायक राहील. यातून उत्तम आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविले जातील, त्यामुळे हा प्रकल्प क्रीडा क्षेत्रातील एक मानाचा केंद्रबिंदू ठरेल.
   या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही आपल्या शुभेच्छा दिल्या असल्याचे आयोजकांनी सांगितले.
     या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.संजय मुखर्जी यांनी या प्रकल्पाविषयीची तांत्रिक व प्रशासकीय माहिती उपस्थित मान्यवरांना दिली. तसेच या प्रकल्पाच्या उभारणीसाठी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केल्याबद्दल सर्व मान्यवरांचे विशेष आभारही मानले.
    कार्यक्रमाच्या सुरुवातीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे या प्रकल्पाचे आभासी उद्घाटन झाले. त्यानंतर या प्रकल्पाच्या निर्मितीबाबतची छोटीशी चित्रफीत प्रदर्शित करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांनी केले तर आभार प्रदर्शन सिडकोचे अधीक्षक अभियंता रमेश गिरी यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test