Type Here to Get Search Results !

• रायगड जिल्ह्यात खळबळ! पेणमध्ये एटीएम सेंटरवर दरोडा; ५६ लाखांची रोकड लंपास करत दरोडेखोरांचा पोबारा


• रायगड जिल्ह्यात खळबळ! पेणमध्ये एटीएम सेंटरवर दरोडा; ५६ लाखांची रोकड लंपास करत दरोडेखोरांचा पोबारा 


रायगड वेध अनिल पवार नागोठणे रोहा


:रायगड जिल्ह्यातील पेण शहरातील मुख्य रस्त्यावरील सनसिटी इमारतीमध्ये असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम सेंटरवर दरोडा पडल्याची घटना घडली असून दरोडेखोरांनी एटीएममधून ५६ लाखांची रोकड लंपास करून पोबारा केला आहे. या दरोड्याच्या घटनेने पेण पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार पेण शहरातील सनसिटी इमारतीमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम सेंटर आहे. या एटीएम सेंटरवर दरोडा पडला. दरोडेखोरांनी तब्बल ५६ लाख ३४ हजार ८०० रुपये लांबवले. दरोड्याच्या घटनेची माहिती मिळताच, पेण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासासाठी फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले होते. दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी श्वान पथकाचीही मदत घेण्यात आली होती.
मागील महिन्यात पेण तालुक्यातील तरणखोप येथेही एका घरात लाखो रुपयांची चोरी झाली होती. पेण शहरातील मुख्य मार्गावरील आठ दुकानेही चोरांनी एकाच रात्रीत फोडून रोकड लंपास केली होती. या घटना ताज्या असतानाच, शहरातील मुख्य रस्त्यावरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम सेंटरला दरोडेखोरांनी लक्ष्य केले. गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन फोडून ५६ लाखांहून अधिक रोकड लंपास केली. या दरोडेखोरांनी स्वतःबरोबर आणलेला गॅस कटर व सिलेंडर एटीएम सेंटरमध्येच टाकून तेथून पळ काढला. पेण शहरात एका मागोमाग एक अशा अनेक चोरीच्या घटना घडत असल्याने चोरटे आणि दरोडेखोरांनी एकप्रकारे पेण पोलिसांनाच आव्हान दिले असून दरोडेखोर पोलिसांवरच शिरजोर होताना दिसत आहेत. वारंवार घडणाऱ्या या अशा घटनांमुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर नागरिकांकडून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. याचबरोबर एटीएमवर पडलेल्या या दरोड्यामुळे बँक अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा स्पष्टपणे उघड झाला आहे. या एटीएमला बँक अधिकाऱ्यांनी साधा सीसीटीव्ही कॅमेराही लावला नव्हता तसेच सीसीटीव्ही कॅमेरे नसतानाही रात्रीच्या वेळी सुरक्षेसाठी एटीएमवर सुरक्षा रक्षकही नेमला नव्हता. नेमका याच गोष्टीचा फायदा उठवत दरोडेखोरांनी या एटीएमवर दरोडा टाकत सुमारे ५६ लाखांची रक्कम लंपास केली.
त्यामुळे कर्तव्यात कसूर करणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पेण शाखेतील अधिकाऱ्यांवर बँक प्रशासनाने दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
दरम्यान या एटीएममधून लाखोंची रक्कम लंपास करणाऱ्या दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आठ पथके तयार केली आहेत.तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीसही तपास करत आहेत. गॅस कटरच्या मदतीने एटीएम मशीन कापले आणि ५६ लाखांची रोकड लंपास केली. या प्रकरणाचा तपास करून नक्कीच दरोडेखोरांना पकडण्यात यश मिळेल, असे रायगडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test