टिम रायगड वेध
गणेशभक्तांसाठी संकष्टी चतुर्थीचा दिवस अत्यंत खास असतेच. पण अनंत चतुर्दशीनंतर येणारी संकष्टी चतुर्थी 'साखरचौथ' म्हणून साजरी केली जाते. काही ठिकाणी या दिवशी बाप्पांचे विसर्जन होते. तर काही ठिकाणी या दिवशी पुन्हा एकदा दीड दिवसांसाठी बाप्पांचे आगमन होते. साधारणपणे रायगड जिल्ह्यात ही प्रथा पाहायाला मिळते. अजून एक प्रथा म्हणजे गणेश चतुर्थीच्या काळात जर घरात काही सुयेर किंवा सुतक आले तर ते संपल्यावर त्यावर्षी साखरचौथीच्या दिवशी ते गणेशभक्त गणपतीची स्थापना करतात.
साखरचौथीच्या गणेशोत्सवासाठी देखील भाद्रपद गणेशोत्सवाप्रमाणे तयारी, सजावट केली जाते. मनोकामना पूर्ण करणाऱ्या गणेशाची पूजा-आरती केली जाते. तसंच मोदकाचा नैवेद्य तर असतोच. पण या दिवशी मोदकाच्या सारणात गुळाऐवजी साखर घातली जाते. त्याचप्रमाणे अनेक घरांमध्ये साखरचौथी निमित्त बाप्पाची खास पूजा केली जाते.
साखरचौथ निमित्त बाप्पाची पूजा कशी कराल?
चौरंग किंवा पाटावर लाल वस्त्र अंथरावे. गणराची मुर्ती/प्रतिमा ठेवावी. चौरंग किंवा पाटाखाली रांगोळी काढून हळद-कुंकू वाहावे. मुर्ती-प्रतिमेवर दूध-पाण्याचा अभिषेक करुन हळद कुंकू, अक्षता वाहाव्या. फुलं, दुर्वा, शमीची पाने वाहावी. दिवा, अगरबत्ती ओवाळा. पुजेसमोर पानाचा विडा ठेवून त्याचीही पूजा करावी. पाच फळे त्यासोबतच चिबूड, काकडी, नारळ यांचाही समावेश असतो. तसंच घरी बनवलेले सात्विक अन्न आणि साखरेच्या मोदाकांचा नैवेद्य बाप्पाला अर्पण केला जातो.
संकष्टी चतुर्थी दिवशी काय आहे चंद्रोदयाची वेळ?
5 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजून 56 मिनिटांनी चंद्रोदय होणार आहे. त्यानंतर चंद्रदर्शनानंतर नैवेद्य दाखवून भाविक उपवास सोडू शकतात.
कोरोना व्हायरसच्या संकटामुळे अद्याप राज्यातील मंदिरे खुली करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे सर्व भाविकांना घरच्या घरी पूजा करावी लागणार आहे. आयुष्यातील संकट, विघ्न दूर करुन सुख, समृद्धी, आनंद, यश लाभावे म्हणून विघ्नहर्त्याची पूजा, प्रार्थना केली जाते.