🛑आकाशातुन पडला सोनेरी दगड, उस्मानाबाद येथील आश्चर्यकारक घटना
टिम रायगड वेध
उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी याठिकाणी एक आश्चर्यकारक घटना उघडकीस आली आहे. वाशी शहरानजीक असलेल्या एका शेतात आकाशातून चक्क सोनेरी दगड पडल्याची घटना घडली आहे.शुक्रवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास संबंधित शेतकरी आपल्या शेतात काम करत असताना, अचानक दोन किलो वजनाचा सोनेरी रंगाचा दगड पडला आहे. शेतकऱ्यांपासून अवघ्या 7 ते 8 फुट अंतरावर हा दगड पडल्याने शेतकरी थोडक्यात बचावला आहे. हा दगड सध्या तहसील कार्यालयात जमा करण्यात आला आहे. प्रभू निवृत्ती माळी नावाच्या शेतकऱ्याच्या शेतात हा दगड पडला आहे.
माळी यांनी आपल्या शेतात भाजीपाल्याचं पीक घेतलं आहे. पण गुरुवारी रात्री उस्मानाबाद परिसरात मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळे शेतातील वाफ्यात पाणी साचलं आहे का? हे पाहण्यासाठी माळी आपल्या शेतात गेले होते.
दरम्यान शुक्रवारी साडेसहाच्या वाफ्याची पाहणी करताना अचानक कसलातरी वाऱ्यासारखा आवाज झाला. काही कळायच्या आतच माळी उभे असलेल्या ठिकाणापासून सात-आठ फूट अंतरावर आकाशातून दोन किलो 38 ग्रॅम वजनाचा सोनेरी दगड पडला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे माळी भयभीत झाले होते. यानंतर त्यांनी त्वरित याची माहिती तहसीलदार नरसिंग जाधव यांना दिली.
तहसील कार्यालयाकडून या दगडाची प्राथमिक तपासणी केल्यानंतर हा दगड उस्मानाबाद येथील भारतीय भूवैज्ञानिक विभागाकडे पाठवण्यात आला होता. हा दगड उल्कापात असल्याची माहिती भूवैज्ञानिकांनी दिली आहे. हा दगड सोनेरी आणि गव्हाळ रंगाचा असून त्यामध्ये विविध थर आहेत. 2 किलो 38 ग्रॅम वजन असणाऱ्या या दगडाची लांबी 7 इंच इतकी आहे तर रुंदी 6 इंच आहे. तर या दगडाची जाडी साडेतीन इंचापेक्षा अधिक असल्याची माहिती भूवैज्ञानिक विभागाकडून देण्यात आली आहे.