Type Here to Get Search Results !

🛑शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करत गणेशोत्सव साजरा करा : नागोठणे पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर

🛑शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करत गणेशोत्सव साजरा करा : नागोठणे पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर

रायगड वेध नागोठणे अनिल पवार

नागोठणे :- संपूर्ण महाराष्ट्राला गणेशोत्सवाचे वेध लागले असून, गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही उत्सवावर करोनाचं विघ्न कायम आहे.करोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षी गणेशभक्तांच्या आनंदावर विरजण पडलं होतं. यंदा गणेशोत्सव जल्लोषात आणि नेहमीच्या थाटात साजरा होईल, अशी आशा होती. मात्र, करोनाच्या दुसऱ्या लाटेनं त्यावर पाणी फेरलं. करोनाची दुसरी लाट ओसरत असली, तरी धोका ओळखून राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी नियमावली निर्धारित केली आहे.याच पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागोठणे पोलीस ठाण्याचे हद्दीतील गावांत आगामी काळात साजरा करण्यात येेणारा गणेशोत्सव शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करत अतिशय साध्या पद्धतीने संयमाने आनंदाने साजरा करा असे आवाहन नागोठणे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांनी शांतता कमिटी व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त बैठकीत उपस्थितांना केले.
नागोठणे येथील शिव गणेश सभागृह येथे दि.०६ रोजी सायं ५.३० वा नागोठणे पोलीस ठाण्याचे वतीने कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांवर आलेला गणेशोत्सव साजरा करताना घ्यावयाची काळजी तसेच शासनाच्या मार्गदर्शक सूचना या संदर्भात माहिती देण्यासाठी शांतता समिती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांच्या सह नागोठणे ग्रामपंचायतीचे सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, माजी सरपंच विलास चौलकर,व्यापारी असोसिएशनचे प्रकाश जैन,अनिल काळे,उपसरपंच मोहन नागोठणेकर,वणीच्या सरपंच प्रगती आवाद,संजय महाडिक,किशोर म्हात्रे,मनोहर सुटे,अखलाक पानसरे,आशिफ मुल्ला,शब्बीर पानसरे,किर्तीकुमार कळस,ज्ञानेश्वर सांळुखे,राम तेलंगे,विक्रांत घासे,पळसचे पोलीस पाटील बबन शिंदे,गणपत डाकी, निलोफर पानसरे,कल्पना टके,किरण काळे, संतोष जैन, हे. कॉ. विनोद पाटील, पो. शि. सत्यवान पिंगळे यांच्या सह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, नागोठणे विभागातील पोलीस पाटील तसेच नागरिक उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर पुढे म्हणाले की,सार्वजनिक आणि घरात विराजमान होणाऱ्या बाप्पाच्या मूर्तींसंदर्भात काही नियम ठरवून देण्यात आले आहेत.राज्य सरकारने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे सार्वजनिक गणेशमूर्तीसाठी ४ फूटांची, तर घरगुती गणेशमूर्ती २ फुटांची असावी अशी मर्यादा घालून देण्यात आली आहे. याचप्रमाणे सर्वांनी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करावी.आरती, भजन, किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. गर्दी होऊन कोरोनाचा प्रसार होईल अशा सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करु नये.
 ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे. शक्यतोवर विसर्जन स्थळी आरती न करता घरीच आरती करावी. आगमन व विसर्जन मिरवणूक काढण्यात येऊ नये.आगमन व विसर्जन वेळी कोणत्याही प्रकारचे वाद्य तसेच डिजे वाजवू नये. विसर्जनस्थळी जास्त गर्दी होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी.तसेच गणेशोत्सव काळात पाच पेक्षा जास्त नागरिक एकत्र येणार नाहीत याची काळजी घ्यावी. गणेशोत्सव काळात कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत तसेच विसर्जन करताना वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी रीतसर परवानगी घेऊनच गणेश मूर्तीची स्थापना करावी. सर्व ठिकाणी सोशल डिस्टनसिंगचे काटेकोर पालन करत सॅनिटाझरचा वापर करावा.शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे तंतोतंत पालन करत कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर काळजी घेत गणेशोत्सव साजरा करण्यात यावा,असेही शेवटी पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांनी स्पष्ट केले.दरम्यान सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, माजी सरपंच विलास चौलकर, व्यापारी असोसिएशनचे प्रकाश जैन, सामाजिक कार्यकर्ते किशोर म्हात्रे यांनी यावेळी गणेशोत्सवा संदर्भातील काही ठळक मुद्दे उपस्थित केल्याने यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली .
 
 *बेफिकीर राहून चालणार नाही : सरपंच मिलिंद धात्रक* 
नागोठणे ग्रामपंचायत सरपंच असलो तरी मी एक डॉक्टर म्हणून आपणांस विनंती करत आहे.ज्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत तरीही काहींना कोरोनाची लागण झाली असून यात काहींना आपला जीव देखील गमवावा लागला आहे.त्यामुळे मी दोन्ही डोस घेतलेले आहेत म्हणून मला कोरोना होणार नाही असा आत्मविश्वास मनात बाळगून बेफिकीर राहून चालणार नाही. रोहा तालुक्यात नागोठणे येथील कोरोना बाधित रुग्ण संख्या जास्त आहे.त्यामुळे आपण सर्वांनी संयम पाळायला हवा.आपल्या प्रत्येकाच्या मनात असणा-या श्रद्धेपोटी आपण गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करत आलोय.मात्र सद्य परिस्थिती पाहता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे तंतोतंत पालन करत गेल्या वर्षी प्रमाणे याही वर्षी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात यावा. गणेश मूर्तीचे विसर्जन एकत्रित करु नये. विसर्जन स्थळी जास्त प्रमाणात गर्दी होणार नाही यासाठी गेल्या वर्षी प्रमाणे गणपती विसर्जनाच्या दिवशीचा आराखडा तयार करून त्याचप्रमाणे सर्व गणेश भक्तांनी आपल्याला दिलेल्या वेळेत गणेश मूर्तीचे विसर्जन करून सहकार्य करावे. विसर्जन स्थळी घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी ग्रामपंचायती कडून ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपलब्ध असणार आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test