🛑सावधान..कोरोना अजून गेलेला नाही, धोका कायमच, केंद्र सरकारने जारी केली नवीन नियमावली
टिम रायगड वेध
सध्या कोरोनाचा वेग कमी झाला आहे. रुग्णसंख्या कमी होत असली तरी काही राज्यांत मात्र परिस्थितीत खराब होत आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही, नागरिकांनी आधिक जबाबदारीने वागायला हवे, असे केंद्र सरकारने आधीच सांगितले होते. मात्र, देशात आता सणासुदीचा काळ सुरू होणार आहे. या दिवसात कोरोना आधिक घातक होण्याची भिती सरकारला वाटत आहे. त्यामुळे आगामी सणासुदीच्या काळाचा विचार केंद्र सरकारने काही नवीन नियम जारी केले आहेत.
सण समारंभामध्ये गर्दी होते. त्यामुळे निष्काळजीपणा आधिक घातक ठरू शकतो. पुढील तीन महिन्यात डेल्टा व्हेरिएंटचा धोका जास्त राहणार असल्याचा इशारा आधीच दिला आहे. तज्ज्ञांनी सुद्धा नागरिकांना सतर्क केले असून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. देशात कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे पुढील तीन महिने आधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. या गोष्टींचा विचार करुन केंद्र सरकारने नवीन नियम जारी केले आहेत.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात अजूनही काही प्रमाणात दुसरी लाट आहे. ज्या राज्यात निर्बंधात सवलती दिल्या आहेत तेथे सुद्धा कोरोना प्रसाराबाबत इशारा दिला गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 21 सप्टेंबर रोजी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना नवीन सूचना दिल्या आहेत. कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केल्या जाणाऱ्या क्षेत्रात जिथे कोरोना संक्रमणाचे प्रमाण 5 टक्क्यांपेक्षा जास्त आहे तिथे सार्वजनिक उपक्रम टाळावेत. तसेच ज्या ठिकाणी संक्रमण दर 5 टक्क्यांपेक्षा कमी असेल अशा ठिकाणी आधी परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे. याबाबत एका हिंदी वेबसाइटने बातमी दिली आहे.
ऑक्टोबर ते नोव्हेंबर या तीन महिन्यांच्या काळात कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. डेल्टा व्हेरिएंटचाही धोका आहे. जोपर्यंत देशातील प्रत्येक व्यक्तीचे लसीकरण होत नाही तोपर्यंत सतर्क राहणे गरजेचे आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले.