Type Here to Get Search Results !

🛑गावागावांमधून उरली फक्त भयाण शांतता...गणेशोत्सवासाठी आलेले चाकरमानी शहराकडे रवाना


🛑गावागावांमधून उरली फक्त भयाण शांतता...
गणेशोत्सवासाठी आलेले चाकरमानी शहराकडे रवाना

रायगड वेध तळा श्रीकांत नांदगावकर

गणेशोत्सवासाठी गावाला आलेले चाकरमानी गणेशोत्सवानंतर पुन्हा शहराकडे रवाना झाल्याने गावागावांमध्ये भयाण शांतता पसरली आहे.तळा तालुका हा दुर्गम व डोंगराळ तालुका असून तालुक्याच्या निर्मितीनंतर २१ वर्षाचा कालावधी लोटला असतानाही तालुक्याचा अपेक्षित विकास होऊ शकलेला नाही.या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या कंपन्या,औद्योगिक क्षेत्र,एमआयडीसी नसल्यामुळे नोकरीच्या शोधात तालुक्यातील तरुण पिढी मुंबई,पुणे, ठाणे,दिवा,नालासोपारा आदी शहराच्या ठिकाणी स्थलांतरित झाली आहेत.तसेच हळूहळू आपल्या कुटुंबाला देखील शहरात बोलावून त्याच ठिकाणी स्थायिक झाले आहेत.कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असल्याने गणेशोत्सवासाठी वर्षातून एकदा संपूर्ण कुटुंब आपल्या गावी परततात.यामुळे गावातील घरी रहात असलेले वयोवृद्ध व्यक्ती संपूर्ण घर स्वच्छ करून घरासमोरील अंगण सारवून ठेवतात.गावातील घराघरांतुन लहानमुलांच्या किलबिलाटाचा आवाज ऐकू येतो. गणेशोत्सवात पाच दिवस घरी पूजा अर्चा,आरती,भजन तसेच गणपतीच्या गाण्यावर सहकुटूंबाने ठेका धारल्याचा आवाज घुमतो.एकत्रितपणे भोजन,घरासमोरील पडवीत एकत्र रंगलेल्या गाण्यांच्या भेंड्या,यामुळे संपूर्ण घर आनंदाने न्हाहून निघतो.मात्र गणपती विसर्जनानंतर गावातील चाकरमानी आपल्या कामावर हजर राहण्यासाठी पुन्हा शहराकडे निघतात तेव्हा संपूर्ण घर सुने सुने पडलेले भासते.संपूर्ण गावातील वातावरण अचानक शांत होऊन जाते.आपल्या वयोवृद्ध आईवडिलांची डॉक्टरांकडून तपासणी करून घरातील मुले आपल्या पत्नी मुलांसह शहराकडे जायला निघतात.परंतु गावातील घरामध्ये असलेल्या त्यांच्या मातापित्यांना संपूर्ण घर खायला उठते.आपली मुले,नातवंडे पुन्हा एकदा घरी येतील म्हणून वर्षभर गणेशोत्सवाची वाट बघत वाटेकडे डोळे लावून बसलेले असतात.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test