Type Here to Get Search Results !

🛑आज हरितालिका ... जाणून घेऊया हरितालिका पूजेबाबत.. आपणांस हरितालिकेच्या शुभेच्छा 💐


🛑आज हरितालिका ... जाणून घेऊया हरितालिका पूजेबाबत

टिम रायगड वेध

हरितालिका व्रताला आपल्याकडे खास महत्त्व आहे. या दिवशी स्त्रिया पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी, सुख आणि समृद्धीसाठी निर्जळी उपवास करून व्रत करतात. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेदिवशी हरितालिकेचा उपवास केला जातो. यंदा हरितालिका ९ सप्टेंबरला साजरी केली जाणार आहे. यंदा हरितालिकेदिवशी १४ वर्षांनंतर रवीयोगाचा दुर्मिळ योगायोग आला आहे. या तृतीयेला उपवास आणि पूजा केल्यामुळे विवाहित लोकांच्या इच्छा पूर्ण होतात, असे मानले जाते.

यंदाच्या हरितालिकेचा शुभयोग ९ सप्टेंबरला दुपारी २.३० ते दुसऱ्या दिवशी १० सप्टेंबरला दुपारी १२.५७ वाजेपर्यंत राहील. हरितालिका व्रताच्या पूजेची सर्वात शुभ वेळ सायंकाळी ५.१६ ते सायंकाळी ६.४५ वाजेपर्यंत असेल. तसेच शुभ वेळ ६.४५ ते ८.१२ वाजेपर्यंत असेल.
ही तृतीया साजरी करण्यामागे अशी अख्यायिका आहे की, भगवान शंकरांना वर म्हणून मिळवण्यासाठी देवी पार्वतीने सर्वांत आधी हरितालिकेचं व्रत केलं होतं. पार्वतीच्या तपस्येने प्रसन्न होऊन भगवान शंकराने देवी पार्वतीचा पत्नी म्हणून स्वीकार केला होता.

हरितालिका पूजा

पूजेसाठी लागणारे साहित्य : चौरंग, रांगोळी, तांदूळ, पाण्याचा कलश, ताम्हन, पळी, पंचपात्र, तसराळ, आसन, निरांजन, शंख, घंटा, समई, कापूरारती, हळदकुंकू, अष्टगंध, गुलाल, बुक्का, चंदन, अक्षता, उदबत्ती, कापूर, तुपाच्या व तेलाच्या वाती, अत्तरफाया, विड्याची पाने, सुपार्‍या, बदाम, खारका, नारळ, फळे, खडीसाखर, गूळखोबरे, पंचामृत, कापसाचे वस्त्र, कोरे वस्त्र, तसेच फणी, काजळ, गळेसरी, कांकणे, आरसा इत्यादी सौभाग्यद्रव्ये. याव्यतिरिक्त फुले, दूर्वा, तुलसीपत्रे, व झाडांची पाने.
या दिवशी मुली व सुवासिनींनी स्नान केल्यानंतर एका जागी चौरंग ठेवावे. रांगोळी काढून व केळीच्या खांबांनी चारही बाजूंनी सुशोभित केलेल्या चौरंगावर वाळू आणून पार्वती आणि सखीसह शिवलिंग स्थापित करावे. उजव्या बाजूस तांदळाच्या एका ढिगावरील सुपारीवर किंवा नारळावर गणपती मांडावा. समोर पाच विडे मांडून तेथे सुपारी, खारीक, बदाम, नाणे, फळ ठेवावे.
सर्वप्रथम स्वत:ला हळद कुंकु लावून देवासमोर विडे ठेवावे. अक्षता, हळद कुंकु वाहून मनोभावे नमस्कार करावा. घरातील वडीलधार्‍या मंडळींना नमस्कार करून नंतर पूजा प्रारंभ करावी. पूजा करण्यापूर्वी दिव्यांची पूजाही करावी. सर्वप्रथम गपपतीची आणि नंतर महादेव व सखी-पार्वतीची षोडशोपचारे पूजा करावी. पूजेसाठी घेतलेले साहित्य विधीपूर्वक देवाला अर्पित करावे. पूजा केल्यावर धूप-दीप, नैवेद्य दाखवून पत्री वाहावी.

हरतालिकेच्या पूजेत पत्री वाहण्याचा क्रम : बेल, आघाडा, मधुमालती , दूर्वा, चाफा, कण्हेर, बोर, रुई, तुळस, आंबा, डाळिंब, धोतरा, जाई, मरवा, बकुळ, अशोकाची पाने वाहावी. नंतर मनोभावे प्रार्थना करावी. कुमारिकेने इच्छितत वर मिळविण्यासाठी तर सुवासिनीने अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी. दिवसभर कडक उपोषण करावे. शक्य नसल्यास फलाहार करावा.

या दिवशी आगीवर बनविलेला कोणताही पदार्थ खात नाहीत. नंतर रात्रभर झिम्मा, फुगडी, टिपऱ्या, गोफ इत्यादी खेळ खेळत जागरण करून हरतालिकेची कथा ऐकून, आरती करून बारानंतर रूईच्या पानावर दही घालून ते चाटावे. दुसर्‍या दिवशी उत्तरपूजा करून ती लिंगे विसर्जन करावी.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test