🛑श्रावणात बोंबील व कोळंबीची आवक वाढली.
खरेदीसाठी नागरिकांची उसळली गर्दी
रायगड वेध तळा प्रतिनिधी श्रीकांत नांदगावकर
तळा बाजारपेठेतील मच्छीमार्केट मध्ये ऐन श्रावणात बोंबील आणि कोळंबी ची आवक वाढली आहे.त्यामुळे खरेदीसाठी नागरिकांनी एकच गर्दी केली आहे.श्रावण हा हिंदू धर्मातील पवित्र महिना असल्याने श्रावणात बहुतांश नागरिक उपवास करतात.परंतु नेमका श्रावण महिन्यात विविध प्रकारची ताजी मच्छी बाजारपेठेत विक्रीसाठी येत असल्याने नागरिकांची चांगलीच पंचाईत होते. ताजे बोंबील,कोळंबी,पापलेट यांची आवक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने हल्ली नागरिक श्रावणात उपवास करणे देखील टाळतात.सध्या तळा बाजारपेठेत राहाटाड,वाशी,राजपुरी या ठिकाणांहून मच्छी विक्रीसाठी उपलब्ध होत असून मच्छीमध्ये बोंबील,कोळंबी,पापलेट,बोइट, जवळा यांची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे श्रावणापूर्वी गगनाला भिडलेले मच्छीचे दर आवक वाढल्याने श्रावणात निम्मे झालेले आहेत. ज्यामध्ये बोंबील शंभर रुपये वाटा, कोळंबी चारशे रुपये किलो, पापलेट सहाशे रुपये किलो, बोईट दोनशे रुपये किलो तर जवळा वीस रुपये वाटा याप्रमाणें विक्री करण्यात येत आहे.
श्रावणात मच्छीची आवक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने खवय्यांसाठी एकप्रकारे पर्वणीच असते. बोंबील व कोळंबीला ग्राहकांकडून अधिक मागणी असते मच्छी स्वस्त दरात मिळत असल्यामुळे ग्राहक देखील खरेदीसाठी गर्दी करतात.
---- मीना लाडे, मच्छी विक्रेती