🛑शाळा सुरू होण्याचे संकेत मिळाल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये उत्साह
रायगड वेध तळा प्रतिनिधी श्रीकांत नांदगावकर
महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील शाळा पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण पसरले आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेले लॉकडाऊन आणि निर्बंधांमुळे मागील दीड वर्षांपासून राज्यातील शाळा महाविद्यालये बंद आहेत.राज्यातील बहुतांश भागात सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाली असून प्रादुर्भाव देखील नियंत्रणात आल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर सध्या ८ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. यांसह उर्वरित १ ली ते ७ वी पर्यंतचे वर्ग देखील लवकरच सुरू करण्याचे संकेत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.कोरोना काळात शाळा बंद असल्या कारणाने लाखो विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय अवलंबावा लागला आहे.दिवसभर मोबाईल मध्ये गुंतून राहिल्यामुळे मुलांमध्ये चिडचिडेपणा तसेच डोळे दुखणे, लवकर चष्मा लागणे यांसारख्या डोळ्यांच्या समस्या देखील झाल्याचे पहायला मिळाले.ग्रामीण भागात विजेची समस्या कायम असते तसेच ग्रामीण भागात सर्वच ठिकाणी इंटरनेट ची सुविधा नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा लाभ देखील घेता येत नव्हता.परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने साधारणपणे १७ ऑगस्ट पासून शाळा सुरू करण्यास सरकार अनुकूल असल्याचे संकेत शाळेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्याने पुन्हा शाळेत जाऊन प्रत्यक्ष शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी उत्सुक झाले आहेत. तसेच प्रशासनाच्या या निर्णयाबाबत पालकांमधूनही समाधान व्यक्त करण्यात येत आहे.