Type Here to Get Search Results !

🛑भिरा-पाटनुस येथे कुंडलिका नदीच्या पात्रात बुडून पुणे येथील पर्यटकाचा मृत्यू.


🛑भिरा-पाटनुस येथे कुंडलिका नदीच्या पात्रात बुडून पुणे येथील पर्यटकाचा मृत्यू.

🛑देवकुंड ला आलेल्या पर्यटक गणेश विसर्जन घाटा जवळ नदीत बुडाला.


रायगड वेध माणगाव प्रतिनिधी गिरीश गोरेगावकर

      माणगांव तालुक्यातील पाटणूस भिरा येथे कुंडलिका नदीच्या पात्रात पोहायला उतरलेल्या सहा तरुणांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाला. बुडत असणाऱ्या तरुणाला दुसरा तरुण वाचवायला गेला असता तोही बुडत होता, परंतु दुसरीकडे पोहत असणाऱ्या मित्राने त्याला हात दिल्याने तो वाचला मात्र पहिला तरुण पाण्याच्या प्रवाहात आल्याने बुडाला. आजूबाजूला स्थानिक कुणीही नसल्याने व सहा तरुणांपैकी कुणालाही पोहता येत नसल्याने तरुणाचा बुडून मृत्यू झाला. थोड्या वेळाने हाकेच्या अंतरावर भिरा आदिवासी वाडी आहे. या तरुणांचा आक्रोश ऐकून ग्रामस्थ धावले परंतु तोपर्यंत बराच उशीर झाला होता. पुण्यातील तरुण नदीत बुडाल्याची बातमी पाटणूस पंचक्रोशीत वाऱ्यासारखी पसरल्याने नागरिकांनी व खास करून तरुणांनी खूप गर्दी केली होती. 
       सदर घटनेची खबर मिळताच पोलीस पाटील प्रदीप म्हामुणकर यांनी पोलीसांना खबर दिली व त्यानुसार पोलीस हवालदार अनिल वडते घटनास्थळी दाखल झाले. यावेळी उपसरपंच चंद्रकांत गुजर, सरपंच नीलिमा निगडे यांचे पती संजय निगडे, माजी उप सभापती आप्पा म्हामुणकर, माजी उपसरपंच आंदेश दळवी व स्थानिक ग्रामस्थ व अनेक तरुण यांच्या उपस्थितीत रेस्क्यू करून बुडालेल्या तरुणाला बाहेर काढण्यात आले. रेस्क्यू ऑपरेशन मध्ये आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रकाश शेलार, त्यांचे चिरंजीव प्रशांत शेलार, आदिवासी बांधव काळू वाघमारे, जानू जाधव, स्थानिक तरुण ओंकार महाडिक, चंद्रशेखर वाडकर यांनी भाग घेऊन तरुणास बाहेर काढले. ज्याठिकाणी हा तरुण बुडाला त्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह छोटा असला तरी तेथे सहा-सात फूट खोल पाणी असून आतमध्ये एक घबर आहे त्यामुळे तेथे सहसा कुणी पोहावयास जात नाही. परंतु दुपारची 12 ची वेळ असल्याने या ठिकाणी कुणीही नसल्याने व पाण्याचा अंदाज न आल्याने तरुण बुडाला. पुढील तापास माणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक खेडकर यांच्या आदेशानुसार पोलीस हवालदार अनिल वडते व पोलीस शिपाई पोंदे अधिक तपास करीत आहेत. 
     मृत तरुणाचे नाव विवेक संजय वाल्मिकी असून वय 18 वर्ष आहे व तो 12 वी चा विद्यार्थी आहे. सोबत त्याचा भाऊ दिवेश वाल्मिकी हा देखील होता मात्र तो सुखरूप आहे. इतर चार जणांची नावे समजू शकली नाही. नदीचे पात्र रस्त्याच्या बाजूला असल्याने अनेक पर्यटक तेथे फोटो शूट साठी थांबतात. त्या ठिकाणी नदीच्या पात्रात उतरण्यास आता ग्रामपंचायत पाटणूस कडून बंधन करण्यात येणार असल्याचे उपसरपंच चंद्रकांत गुजर यांनी सांगितले.
      या ठिकाणी देवकुंड धबधबा फिरण्यासाठी १४४ कलम लागू असूनही दर शनिवार रविवारी हजारो पर्यटक पुणे- मुंबई येथून येत असतात अश्यातच हे पर्यटन स्थळ विकसित झाले नसल्याने पर्यटकांना जीव गमवावा लागत आहे. मात्र गावकऱ्यांची मजबूत कमाई सुरू आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test