🛑स्वातंत्र्यदिनी कर्जत मधील रेस्क्यू टीमचा सन्मान
टिम रायगड वेध
रक्षा सामाजिक विकास मंडळ ही संस्था सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन यामध्ये गेली 3 वर्ष कार्यरत आहे. या संस्थेच्या रेस्क्यू टीमने बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपत्ती काळामध्ये प्रशासनाला आणि नागरिकांना सहकार्य केले आहे. याबद्दल यावषी्र दि.15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कर्जत पोलीस स्टेशन व कर्जत नगरपरिषद पालिका यांच्या वतीने रक्षा सामाजिक विकास मंडळ संस्थेच्या रेस्क्यू टीमचा सन्मान करण्यात आला. या सन्मान सोहळ्यात कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, सर्व नगरसेवक व मुख्याधिकारी पंकज पाटील उपस्थित होते.
दि.21 व 22 जुलै रोजी अतिवृष्टीमुळे आलेल्या आपत्तीमध्ये संस्थेच्या सदस्यांनी कर्जत तालुक्यातील व्यक्तींना पूराच्या पाण्यातून सुरक्षितरित्या बाहेर काढले. याचबरोबर काही व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेले होते, अशा व्यक्तींचा शोध घेण्याचेही कार्य केले. महाड येथील तळीये गावात जाऊन राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दल व ठाणे आपत्ती प्रतिसाद दल यांना सहकार्य केले. याचबरोबर महाड नियंत्रण कक्ष येथे वायरलेस द्वारे तळीये व जिल्हाधिकारी कार्यालय, आपत्ती व्यवस्थापन कक्ष येथे समन्वय साधण्याचे कार्य केले.
रक्षा सामाजिक विकास मंडळाच्या 4 सदस्यांनी अंडर वॉटर रेस्क्यूचे प्रशिक्षण घेतले आहे, या प्रशिक्षणाचा उपयोग करून, दि. 5 ऑगस्ट रोजी सुमित गुरव, प्रसाद गिरी व इतर सदस्य यांनी स्कूबा डायविंग या पद्धतीचा वापर करून पोशिर येथे बुडालेल्या एका व्यक्तीचा शोध घेण्याचा दोन दिवस प्रयत्न केले. या कार्याची दखल घेऊन अक्षय गुप्ता, अभिजीत मोरबेकर, सुमित गुरव, प्रसाद गिरी आणि अमित गुरव यांचा गौरव करण्यात आला.
याचबरोबर या कार्याची व आपत्ती काळात केलेल्या शोध व बचाव मोहिमांची दखल घेत रक्षा सामाजिक विकास मंडळाच्या रेस्क्यू टीमचा कर्जत पोलिस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक श्री. भोर व श्री.सोनावणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी कर्जत पोलिस स्टेशनचे इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
रक्षा सामाजिक विकास संस्थेने केलेल्या या नि:स्वार्थ देशसेवेबद्दल संस्थेच्या कार्यकर्त्यांचे व रेस्क्यू टीमचे कौतुक केले जात आहे.